Loksabha 2019 : काकडे परिवार करणार संग्राम जगताप यांचा प्रचार 

kakde
kakde

नगर -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक व ज्येष्ठ भाजप नेते ऍड. शिवाजीराव काकडे आणि विखे पाटील घराण्याचे समर्थक असलेल्या त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे या आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर दाखल झाल्या. लोकसभा निवडणुकीत काकडे दाम्पत्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचार करणार आहे. 

काकडे दाम्पत्य गेल्या विधानसभेला भाजपकडून इच्छूक होते. उमदेवारी अर्ज दाखल करण्याबाबत त्यांना कळविण्यातही आले होते. त्यानुसार त्यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली. तथापि, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिटे अगोदर काकडे यांना पक्षाचा "एबी' फॉर्म नाकारून तो अचानकपणे आमदार मोनिका राजळे यांना देण्यात आला. त्यानंतर राजळे यांनी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत काकडे दाम्पत्याने राजळे यांच्यासाठी त्यांच्या बरोबरीने प्रचार केला. त्या वेळी त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपची उमेदीवारी देण्याचा शब्द तत्कालीन श्रेष्ठींनी दिला होता. शिवाजीराव की, हर्षदा काकडे, याबाबतचा निर्णय श्रेष्ठींनी त्यांच्यावरच सोपविला होता. त्यानुसार काकडे दाम्पत्य गेली चार वर्षे भाजपचे काम नेटाने करत आहे. मात्र, गेल्या आठवड्यात नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाथर्डी येथील प्रचारसभेत मंत्री पंकजा मुंडे यांनी मोनिका राजळे यांना या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्याचे सुतोवाच जाहीरपणे केले. 

राजळे यांच्याविषयीच्या या घोषणेमुळे काकडे दाम्पत्य तेव्हापासूनत अस्वस्थ होते. साहजिकच ते विखे यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. दुर्देवाने विखे परिवाराने देखील काकडे दाम्पत्याला गृहीत धरुन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. काकडे व राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर घुले यांचे राजकीय वैर सर्वश्रृत आहे. परंतु पक्षाचे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी कंबर कसलेल्या घुले यांनी ही नाराजी हेरीत दोन पावले मागे जाण्याची तयारी दर्शविली. त्यांनी काकडे यांच्याशी चर्चा करुन संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रीय होण्याचे आवाहन केले. आज ज्येष्ठ नेते शरद पवार शेवगावमध्ये आले असता घुले यांच्या पुढाकाराने ते थेट काकडे यांच्या "पृथ्वी' बंगल्यावर पोचले. तेथे पवार व काकडे दांम्पत्यामध्ये चर्चा झाली. चर्चेतील तपशील हाती लागला नाही. मात्र, त्यानंतर लगेचच हर्षदा काकडे थेट पवार यांच्या व्यासपीठावर दाखल झाल्या. या घटनेला शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील राजकीय गणिताच्या दृष्टीने विशेष महत्व आहे. हर्षदा काकडे आत्तापर्यंत शेवगाव तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या विविध गटांमधून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे संग्राम जगताप यांच्याबरोबरच आगामी काळात आपल्याही काकडे दांम्पत्याचा राजकीय पाठिंब्याचा फायदा होईल, अशी अटकळ घुले यांची असणे स्वाभाविक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com