Loksabha2019 : स्वाभिमानाची ताकद दाखवून द्या : कांचन कुल 

प्रफुल्ल भंडारी 
मंगळवार, 9 एप्रिल 2019

बारामती लोकसभेची निवडणूक ही एकट्या दौंडच्या सूनबाईची लढाई नसून स्वाभिमानी दौंडकरांची लढाई आहे. विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी दौंडकरांनी ताकद दाखविली असून आता लोकसभा निवडणुकीत अशीच ताकद दिल्लीला दाखवून द्या

दौंड  (पुणे) : बारामती लोकसभेची निवडणूक ही एकट्या दौंडच्या सूनबाईची लढाई नसून स्वाभिमानी दौंडकरांची लढाई आहे. विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी दौंडकरांनी ताकद दाखविली असून आता लोकसभा निवडणुकीत अशीच ताकद दिल्लीला दाखवून द्या, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी केले आहे. 
 
दौंड शहरात काल (ता.8) कांचन कुल यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली होती व पदयात्रेनंतर महेश सोसायटी जवळ पार पडलेल्या सभेत कांचन कुल यांनी हे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाईं, रासप, आदी पक्षांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

कांचन कुल म्हणाल्या,  "राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यात केलेली विकासकामे आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अधिकाधिक लोकांना लाभ मिळवून दिल्याने त्यांच्या कार्याची दिल्लीत नोंद झाल्याने मला भाजपची उमेदवारी दिली गेली. सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने त्या बळावर मी निवडणूक लढवत आहे. महायुती खंबीरपणे पाठीशी असल्याने आपल्याला कोणाचीही भीती नाही. मतदारसंघात प्रचार करताना प्रतिसाद चांगला मिळत असून निवडणुकीसाठी भाजपसाठी वातावरण खुप चांगले आहे पण गहाळ राहू नका. विकासकामांसाठी मला निवडून द्यावे. `` 
 
तुमच्या सूनबाईंचा नमस्कार....
कांचन कुल यांनी व्यासपीठावरील प्रमुख लोकांचा नामोल्लेख केला आणि नजरचुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास त्यासाठी स्वतः हुन दिलगिरी व्यक्त करण्यासही त्या विसरल्या नाहीत. त्यानंतर `सर्वप्रथम तुमच्या सुनबाईंचा तुम्हाला नमस्कार`, असे म्हणत भाषणाला सुरवात करताच त्यास उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. 
 

Web Title: Kanchan Kool has appealed to the people for vote