Loksabha 2019 : कांचन कुल यांच्याकडे पावणेपाच कोटींची संपत्ती

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 एप्रिल 2019

- कांचन कुल यांच्याकडे एकूण चार कोटी 75 हजारांची मालमत्ता.

- सोने-चांदी, जमीन, कार यांचाही समावेश

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्याकडे एकूण चार कोटी 75 लाख 72 हजार 790 रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यापैकी त्यांच्या नावे एक कोटी 87 लाख 26 हजार 15 रुपये पती
आमदार राहूल कुल यांच्या नावे 2 कोटी 57 लाख 18 हजार 705 रुपये मुलगा आदित्य याच्यानावे तीन लाख 28 हजार तर मुलगी मायरा हिच्या नावे 28 लाख 70 रुपयांची संपत्ती असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

या संपत्तीत पती-पत्नीकडे असलेली रोख रक्कम, बंधपत्रे, ऋणपत्रे, शेअर्स, राष्ट्रीय बचत योजना, विमापत्रे, मोटार वाहने, सोने, चांदी आदी जंगम मालमत्ता, शेतजमीन, बिगरशेती जमीन, निवासी इमारती आदी स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.

जंगम मालमत्तेत कांचन कुल यांच्याकडे रोख 50 हजार रुपये तर, पती राहुल कुल यांच्याकडे रोख एक लाख 20 हजार रुपये असल्याचे आणि पती-पत्नी आणि मुलाकडे मिळून 875 ग्रॅम सोने, पाच किलो चांदी, दोन इनोव्हा कार, 20 लाख सात हजार 897 रुपयांची विमापत्रे, आदींचा समावेश आहे.

स्थावर मालमत्तेत पती-पत्नी व मुलीच्या नावे सात हेक्‍टर 99 आर शेतजमीन, पती राहुल कुल यांच्या नावे 21 हजार 284 चौरस फूट बिगरशेती जमिनीचा समावेश आहे. मुलीच्या नावे असलेली 1 हेक्‍टर 39 आर शेतजमीन ही 2018 मध्ये खरेदी करण्यात आली असून, उर्वरीत सर्व जंगम मालमत्ता ही वारसाप्राप्त आहे. कांचन कुल यांच्या नावे बिगरशेती जमीन नाही. मात्र, त्यांनी 2010 मध्ये पुण्यातील येरवडा येथे 1170 चौरसफुटाची सदनिका खरेदी केलेली आहे.

दरम्यान, कुल पती-पत्नीकडे मिळून राहू येथील विविध कार्यकारी सोसायटी आणि दौंड येथील स्टेट बॅंक इंडियाचे मिळून 22 लाख 50 हजार 279 रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये पाच लाख 98 हजार रुपयांच्या पीक कर्जाचा तर, 16 लाख 52 हजार 379 रुपयांच्या कार खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे.

Web Title: Kanchan Kool has Total Property of 4 crores and 75 thousand