Loksabha 2019 : कांचन कुल यांचे विजयासाठी खंडोबाला साकडं (व्हिडिओ)

रमेश वत्रे
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

- कांचन कुल यांनी विजयासाठी घातले खंडोबाला साकडं

जेजुरी : यंदा चांगला पाऊस पडू दे... दुष्काळ हटू दे... शेतकरी सुखी होऊ दे... मतदारसंघ सुजलाम सुफलाम होण्यासाठी आम्हाला बळ द्या...असे साकडे जेजुरीच्या खंडोबाला घातल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

''आज खंडोबाचं एकत्रित दर्शन घ्यायचे आहे. तुम्ही जेजुरीला या.'' बारामतीतील मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा स्त्री हट्ट आमदार राहुल कुल यांना आज पुरा करावा लागला. कांचन कुल यांचा आज जेजुरी, सासवड परिसरात प्रचार दौरा होता. या दौऱ्याचे औचित्य साधत कांचन कुल यांनी पतीसह दर्शन घेतले. दोघे जेजुरी गडाच्या पायथ्याला आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार कुल यांना पत्नी कांचन यांना उचलून घेत पाच पायऱ्या चढावं लागलं. यावेळी कार्यकर्त्यांनी यळकोट जयमल्हार, सदानंदाचा यळकोट, कांचनताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या.  

शिवसेनेचे दिलीप यादव, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, राहुल शेवाळे आदी उपस्थित होते. गडावर गेल्यानंतर कुल यांनी सपत्नीक खंडोबाचं दर्शन घेतले. यावेळी राहुल कुल यांनी गडावरील मानाची तलवार ( खंडा ) उचलून तीचे दर्शन घेतले. 

Web Title: Kanchan Kool Visits Khandoba Temple in Jejuri