कारणराजकारण : देहू संस्थानचा विकासच नाही... (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

देहू गाव आणि देहू संस्थानाचा विकास अपेक्षेप्रमाणे होत नाही. जी कामे झाली ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असे देहू संस्थांनचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले.

पुणे : देहू गाव आणि देहू संस्थानाचा विकास अपेक्षेप्रमाणे होत नाही. जी कामे झाली ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असे देहू संस्थांनचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले.

'सकाळ'च्या 'कारणराजकारण' उपक्रमांतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याअंतर्गत देहू गाव आणि देवस्थानच्या विकासाबाबत नागरिकांनी चर्चा करण्यात आली. यावेळी मोरे म्हणाले, 'जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, संस्थानचा विकास त्या प्रमाणात झाला नाही.'  मावळ मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बिरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यात थेट लढत होत आहे.

देहू ग्रामपंचायत अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राज्यात आघाडीचे सरकार असताना देहू ग्रामपंचायत आणि देहू संस्थांसाठी भरघोस निधी दिला असल्याचे सरपंच ज्योती टिळेकर यांनी सांगितले. तर, संस्थान आणि गावचा विकास अपेक्षेप्रमाणे झाला नसल्याचा आरोप विरोधकांनी  केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पार्थ यांना साधे बोलताही येत नसल्याचे सांगितले. तर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारणे यांचे शिक्षण दहावीच असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

यावेळी संस्थानचे मधुकर महाराज मोरे, विश्वस्थ माणिक महाराज मोरे, सरपंच ज्योती टिळेकर, कांतीलाल काळोखे, रत्नामाला करंडे, नारायण पचपींड, सुनिल हागवणे आदी उपस्थित होते.

Web Title: KaranRajkaran discussion with villagers at Dehu