Loksabha 2019 : मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करा

Loksabha 2019 : मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करा

मुंबई : महाराष्ट्रासारख्या क्रमांक दोनच्या जागा असलेल्या राज्यात कॉंग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना व्यथित करणारे आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत आहेत हे लक्षात ठेवा..! असा सज्जड दमवजा इशारा आज कॉंग्रेसश्रेष्ठींनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला. राहुल गांधी यांचे उजवा हात मानल्या जाणाऱ्या वेणुगोपाल यांनी व्यक्‍तिश: प्रत्येक महत्त्वाच्या नेत्याशी चर्चा केली. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातला प्रत्येकच नेता नाराज आहे. जागोजागी झालेली बंडखोरीची लागण, सांगलीसारख्या बालेकिल्ल्यात पक्षाला उमेदवार न मिळणे, पुण्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागेबाबत अद्याप घोळ सुरू असणे, तसेच कॉंग्रेसनिष्ठ घराण्याने उठाव करण्याच्या प्रकाराबद्दल पक्षश्रेष्ठी चिंतीत आहेत. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने आधीपासून मोर्चेबांधणी केली नाही, अशी कैफियत राज्यातील काही बड्या नेत्यांनीही श्रेष्ठींसमोर मांडल्याचे समजते. त्यावर ही एकदिलाने काम करण्याची वेळ आहे, लवकरच विधानसभा निवडणुका येत आहेत ते कसे विसरता? आपापली संस्थाने, मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा, असे समजावून सांगण्यात आले.

संजय निरूपम यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण हटाव अशी मोहीम छुप्या स्वरूपात सुरू करण्याचा काही जणांचा मानस असल्याचेही सांगितले जात होते. पण आज त्यावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न झाला. 

मिस्त्रींचे लक्ष 

दिल्लीतून मधुसूदन मिस्त्री यांना महाराष्ट्राकडे लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत पाठविण्यात आले आहे. ते सर्वतोपरीने मदत करतील असेही सांगण्यात आले आहे. आज बैठकीत तक्रारीचा सूर लागू नये याचीही वरिष्ठ नेत्यांनी रात्रीपासून काळजी घेतली होती.

महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने केवळ दोन जागा जिंकल्या होत्या. ती वेळ पुन्हा येऊ देऊ नका, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली असल्याचेही विश्‍वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याबरोबरच महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे स्वत: निवडणूक लढवत असल्याने आधीच चिंतेचा प्रदेश झालेल्या महाराष्ट्राकडे लक्ष देणे कॉंग्रेससाठी अधिकच आवश्‍यक झाले आहे. 

विखेंची उपस्थिती 

मिस्त्री हे कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षात सुसूत्रता ठेवण्याचे काम पाहतील. कॉंग्रेस उमेदवारांची शक्‍ती भाजप शिवसेनेच्या तुलनेत कमी पडू नये याची काळजी घ्या, असे आवाहनही करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज बैठकीला हजर होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरसारख्या मतदारसंघापासूनच कुरघोडीला प्रारंभ केल्याची तक्रारही श्रेष्ठींना ऐकवण्यात आली. काही नाराज निष्ठावंतांना आज भेट नाकारण्यात आली, असेही सांगण्यात येते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com