जर्मनीत शिकलेले कोल्हापूरचे खासदार.. तुम्हाला माहीत आहेत?

जर्मनीत शिकलेले कोल्हापूरचे खासदार.. तुम्हाला माहीत आहेत?

कोल्हापूरला आता जेथे अयोध्या टॉकीज आहे. त्या टॉकीजचे पूर्वीचे नाव ‘राजाराम’ असे होते. आईसाहेब महाराजांच्या पुतळ्यासमोरची ही टॉकीज मनोरंजनाचे जरूर एक केंद्र होती. पण, या टॉकीजच्या आवारात एका बैठ्या इमारतीत मेजर दादासाहेब निंबाळकर ऐसपैस खुर्चीत बसून असत. ते टॉकीजचे मालक आणि त्यांच्यासमोर कोल्हापुरातल्या विविध घटकातले लोक गप्पा किंवा अन्य कारणासाठी एकत्र बसलेले असत. चर्चेचा फडच तेथे रंगलेला असे. किंबहुना राजाराम टॉकीज राजकीय-सामाजिक घडामोडींचे केंद्र ठरलेले असे.

या दादासाहेब निंबाळकर यांचे चिरंजीव राजाराम निंबाळकर हे १९७१ मध्ये कोल्हापूरचे खासदार होते. या निवडणुकीला काँग्रेसमधील फुटीची पार्श्‍वभूमी होती. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. पण, इंदिरा गांधी यांच्या विरोधात पक्षात सूर उमटू लागला व काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यामुळे संसदेत काँग्रेसला बहुमत उरले नाही व खुद्द इंदिरा गांधींनी नवकाँग्रेसची स्थापना करून एक वर्ष अगोदर निवडणुकीचा निर्णय घेतला.

१९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेसाठी राजाराम निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली. उच्चशिक्षित लोक खासदार म्हणून निवडून यावेत, यासाठी राजाराम निंबाळकर यांच्या नावाचा आग्रह धरला गेला आणि वास्तवही तेच होते. राजाराम निंबाळकर पश्‍चिम जर्मनीतील म्युनिच विद्यापीठातून पदवीधर होते. राजकीय, अर्थ, मिलिटरी, हिस्ट्री, तत्त्वज्ञान अशा विविध घटकांवर त्यांचा अभ्यास होता. कोल्हापुरात बिलियर्डस या खेळाचे ते जनक होत. १९५० ते १९६२ या कालावधीत ते जर्मनीत असल्याने जर्मन साहित्यावरही त्यांचा अभ्यास होता.

उच्चविद्याविभूषित अशा या राजाराम निंबाळकरांची नवकाँग्रेसचे उमेदवार म्हणून राजकीय क्षेत्रात पहिली उडी होती. त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचे दाजीबा देसाई होते. १९७१ च्या काळात इंदिरा गांधी व त्यांच्या पक्षाचे गाय-वासरू चिन्ह घराघरात पोचले होते. ‘गाय वासरू ,नका विसरू’ ही घोषणा तर लहान मुलेही एका सुरात देत होती. यशवंतराव मोहिते यांच्यासारखे नेते प्रचारसभा गाजवत होते. दौलतराव निकम, उदयसिंगराव गायकवाड, श्रीपतराव बोंद्रे ही मंडळी प्रचारात अग्रभागी होती. त्याचा परिपाक राजाराम निंबाळकर यांच्या विजयात झाला. त्यांना २ लाख ३ हजार ९६७ मते मिळाली. दाजीबा देसाई यांना ९५ हजार ९६७ मते मिळाली. विक्रमी मतांनी निंबाळकर निवडून आले.

खासदार म्हणून त्यांनी संसदेत वेगळेपण जपले. खासदाराने खासदारासारखेच राहावे, हा संदेश त्यांनी कृतीतून दिला. लष्कर प्रमुख, केंद्रीय सचिव, राष्ट्रीय खेळाडू, अर्थ, कृषी सल्लागार यांच्यात त्यांची ऊठबस राहिली. कोल्हापुरात आले, की राजाराम टॉकीजसमोरची ती बैठी इमारत त्यांनी लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सदैव खुली ठेवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com