Loksabha 2019 : कर्जतकडे युतीच्या नेत्यांची पाठ

maval_barane_parth_pawar.jpg
maval_barane_parth_pawar.jpg

 कर्जत  : कर्जत विधानसभा मतदारसंघ 2014 मध्ये युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता. त्या कर्जत तालुक्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना, भाजप, आरपीआयचा एकही नेता प्रचारासाठी आलेला नाही किंवा त्यांचे नियोजन देखील नाही. त्यामुळे कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला बाय दिला आहे काय? अशी चर्चा रंगू लागली असून युतीकडून घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा राबविली जात असल्याचे सांगितले जात आहे.

कर्जत तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात चढाओढ सुरू असते, त्यात यावेळी तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाची ताकद असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांची ताकद वाढलेली दिसते पण, त्यावेळी शिवसेनेसोबत भाजप आणि आरपीआय असल्याने युती देखील पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ताकद लावून होती. मागील लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना 28 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य टिकवून ठेवण्यासाठी युतीकडून जोरदार प्रचार पहिल्या टप्प्यात केला गेला. मात्र प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस कडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. त्यासाठी अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्या प्रचाराच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यावेळी कर्जत तालुक्यात युतीकडून कोणत्याही सभा आयोजित करण्यात आल्या नाहीत. खासदार बारणे यांच्या भेटीनंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपचे तालुका अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे कर्जतला आले. पण 20 एप्रिलपासून शिवसेना, भाजप, आरपीआयकडून कोणताही मोठा नेता कर्जतमध्ये प्रचारासाठी आला नाही आणि येण्याचे नियोजन देखील नाही. त्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदित्य संवाद कार्यक्रम रद्द झाल्याने शिवसेनेकडून आणि भाजप कडून मंत्र्यांच्या सभा आयोजित केल्या गेल्या नाहीत. यामुळे युतीने कर्जत तालुका राष्ट्रवादीच्या नेत्यांची गर्दी पाहता बाय दिला आहे काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाने केलेले प्रचाराचे नियोजन करून कर्जत तालुका टार्गेट केला असून पार्थ पवार यांना मोठी आघाडी मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यावेळी युतीकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटीवर भर देण्यात आला आहे. जाहीर सभात वेळ घालविण्यापेक्षा एकही मतदार भेटला नाही असे व्हायला नको या दृष्टीने नियोजन केले असून शिवसेना, भाजप, आरपीआयचे कार्यकर्ते आपल्या तालुक्यातून आघाडी देण्यावर ठाम आहेत. मात्र युतीच्या नेत्यांच्या नसलेल्या बैठका, दौरे, सभा यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचे फावले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. युतीचा घरोघरी प्रचार भारी पडतो की, राष्ट्रवादी आघाडीच्या सभा हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com