Loksabha 2019 : कर्नाटकाच्या ‘कुरुक्षेत्रात’ ‘कृष्ण’ रिंगणाबाहेरच

संजय उपाध्ये
सोमवार, 15 एप्रिल 2019

कारकीर्दीवर एक नजर

 •  १९६२ पासून ५५ वर्षे राजकारणात
 •  मद्दूरमधून विधानसभेवर ४ वेळा आमदार
 •  १९९९-२००४ ला कर्नाटकाचे १६ वे मुख्यमंत्री
 •  १९६८ पासून मंड्यामधून चारवेळा खासदार
 •  १९७२ ते १९७७ ला विधानपरिषदेवर
 •  १९९६ पासून राज्यसभेवर प्रतिनिधीत्व

संपूर्ण कर्नाटकावर प्रभुत्व गाजवून ५०-५५ वर्षे राजकारण केलेल्या एस. एम. कृष्णा यांची अनुपस्थिती या निवडणुकीत पहिल्यांदाच पाहावयास मिळत आहे. काँग्रेस पक्षातून बाहेर पडून भाजपचे कमळ हातात घेतलेले कृष्णा भाजपमध्येही सक्रिय नाहीत. भाजपबरोबरच काँग्रेसलाही यंदा प्रचारात त्यांची उणीव मात्र जाणवत आहे.

दक्षिण कर्नाटकावर मोठा प्रभाव पाडणारे नेते म्हणजे एस. एम. कृष्णा. राज्यात आणि केंद्रात लिलया संचार करणारे नेते म्हणून कृष्णा यांचे मोठे नाव आहे. त्यांनी प्रजा सोशॅलिस्ट पार्टीच्या उमेदवारीवर १९६२ रोजी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. विशेष म्हणजे मद्दूर या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार खुद्द जवाहरलाल नेहरू यांनी केला होती, तरीही त्यांनी विजयश्री खेचून आणला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ५०-५५ वर्षांनीसुद्धा आजही त्यांचे कर्नाटकाच्या राजकारणात नाव घेतले जाते.

कार्यकर्त्यांपासून ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदारापासून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी अनेक पदे सांभाळली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दुसऱ्या टर्ममध्ये कृष्णा यांना परराष्ट्रमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कर्नाटकात विस्कटलेल्या काँग्रेसला एकत्र करत १९९९ ला एकहाती सत्ता मिळविताना तब्बल १३३ जागा पटकावित ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.२००४ ची निवडणूक काँग्रसने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लढवली, मात्र काँग्रेसला केवळ ६५ जागा मिळाल्या. भाजप ७९ जागा मिळवित सर्वात मोठा पक्ष बनला. पक्षश्रेष्ठीच्या आदेशानंतर त्यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांना नवी जबाबदारी दिल्यानंतर ते मुंबईला निघून गेले.

२००८ पर्यंत त्यांनी राज्यपाल म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यांना परराष्ट्रमंत्रीपदाची जबाबदारी दिली, पण मंत्रिमंडळ पुनर्रचनेत नव्यांना स्थान देण्याच्या कारणास्तव त्यांना वगळण्यात आले.तेथूनच कृष्णा काँग्रेस पक्षश्रेष्ठींबद्दल नाराज झाले. २०१७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण तेथेही ते सक्रिय नाहीत.२०१९ च्या कर्नाटकाच्या ‘कुरुक्षेत्रात’ ‘कृष्ण’ म्हणजे एस. एम. कृष्णा रिंगणाबाहेरच राहिले आहेत. 

कारकीर्दीवर एक नजर

 •  १९६२ पासून ५५ वर्षे राजकारणात
 •  मद्दूरमधून विधानसभेवर ४ वेळा आमदार
 •  १९९९-२००४ ला कर्नाटकाचे १६ वे मुख्यमंत्री
 •  १९६८ पासून मंड्यामधून चारवेळा खासदार
 •  १९७२ ते १९७७ ला विधानपरिषदेवर
 •  १९९६ पासून राज्यसभेवर प्रतिनिधीत्व
Web Title: Loksabha 2019 S M Krishna out of fray in Karnataka