Loksabha 2019 : यंदाची निवडणूक सोशल मिडियावरच

social media
social media

बारामती शहर - यंदाची लोकसभेची निवडणूक आजवरच्या निवडणूकांपेक्षा सर्वाधिक हायटेक स्वरुपाची असेल. बदलत्या काळानुसार मतदारही हायटेक झाल्याने यंदा प्रचारासाठी सर्वाधिक वापर सोशल मिडीयाचाच होईल अशी चिन्हे आहेत. 

गेल्या सर्वच लोकसभांच्या तुलनेत यंदा कमी श्रम व पैशात सहजतेने प्रत्येक मतदारांपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सर्वच राजकीय पक्ष सोशल मिडीयाकडे पाहत आहेत. 

स्मार्ट फोन्सचा वापर सर्वाधिक...
यंदाच्या निवडणूकीसाठी सर्वाधिक वापर कशाचा होणार असेल तर तो स्मार्ट फोन्सचाच होईल. आज केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही सर्वांकडेच स्मार्ट फोन्स सर्रास आहेत. राजकीय पक्ष विविध माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत स्मार्ट फोनद्वारे पोहोचण्याचाच प्रयत्न करणार आहेत. 

फेसबुक, व्हॉटसअँप, इन्स्टाग्रामवर भर...    
युवकांसोबतच सर्वच वयोगटातील लोकांमध्ये फेसबुक, व्हॉटसअँप व इन्स्टाग्रामचा वापर सर्वाधिक केला जातो. दिवसातील बहुसंख्य वेळ अनेक जण यावर भेट देतात. या माध्यमातून आपली छबी, पक्षाचे चिन्ह व जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. 

तंत्रज्ञानाने काम केले सोपे...
इंटरनेट व सोशल मिडीयाच्या माध्यमातून यंदा निवडणूकीचे काम तुलनेने अधिक सोपे झाले आहे. लोकसभा मतदारसंघातील काही लाखातील मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचणे सर्वच राजकीय पक्षांना अशक्य असते. अशा वेळेस व्हॉईस व व्हिडिओ मेसेजसह छोट्या मुलाखती, पक्षाची ध्येयधोरणे, जाहिरनामा, आगामी काळात करणार असलेली कामे यांची माहिती सहजतेने प्रत्येक मतदारापर्यत पोहोचविणे आता शक्य आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा मोबाईल क्रमांक मिळविण्याचे प्रयत्न ब-याच राजकीय पक्षांनी केलेले असल्याने किमान नव्वद टक्के मतदारांपर्यंत प्रभावीपणे पक्षप्रचार होईल, असा विश्वास राजकीय पक्षांना वाटतो. 

मतदारनिहाय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या...
दरम्यान प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रनिहाय बूथनिहाय प्रत्येकी 25 ते 40 मतदारांमागे एक अशा पध्दतीने कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या राजकीय पक्षांकडून झाल्या आहेत. जेणेकरुन एका कार्यकर्त्याने त्याच्याकडी 40 मतदारांवरच लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यांच्यापर्यंत पक्षचिन्ह, साहित्य पोहोचविण्यासह मतदानाच्या दिवशी ते मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान करतील याची काळजी त्याने घ्यायची आहे. यासाठीही कार्यकर्ते ग्रुप व इतर साहित्याचा वापर करीत आहेत. 

पक्षनिहाय अँपद्वारेही माहितीचे संकलन
पक्षनिहाय स्वतंत्र अँप तयार करुन मतदारांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या नेटवर्कशीही सतत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न होताना दिसतो. कोणतीही माहिती मागितली की कार्यकर्ते लगेचच मोबाईलमधून ते पुरवित आहेत. पेपरलेस कारभार झाल्याने व प्रत्येकाकडे सर्व माहिती उपलब्ध असल्याने त्याचा चांगला परिणाम मतदारांपर्यंत पोहोचण्यात यंदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com