Loksabha 2019 :  गोरे-मोहितेंच्‍या बालेकिल्ल्यात शिंदेंचा शिरकाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मोहिते-पाटील व शेखर गोरे, आमदार जयकुमार गोरे विरोधकांची सोबत घेऊन माढ्याचा गड सर करण्यासाठी संजयमामा यांनी या मतदारसंघात शिरकाव केला आहे. 

सोलापूर - माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचे माण, माळशिरसमध्ये काय होणार? हा जिल्हा-वासीयांसमोर महत्त्वाचा प्रश्‍न आहे. समदुःखी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांची मोट बांधण्यात माहीर असलेल्या संजय शिंदे यांनी माण, खटाव आणि माळशिरसमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे. मोहिते-पाटील व शेखर गोरे, आमदार जयकुमार गोरे विरोधकांची सोबत घेऊन माढ्याचा गड सर करण्यासाठी संजयमामा यांनी या मतदारसंघात शिरकाव केला आहे. 

फलटणचा गड सांभाळण्याची जबाबदारी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी घेतली आहे.  निंबाळकर बंधूंची ही एकी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना फलटणमध्ये रोखून धरेल, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. माण-खटाव आणि माळशिरसमधील एकेकाळचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या प्रेमात पडल्याने या तालुक्‍यात राष्ट्रवादीला कोण साथ देणार? हा प्रश्‍न मधल्या काळात उपस्थित झाला होता. या दोन्ही तालुक्‍यांतील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन माढ्याचा गड जिंकण्यासाठी संजय शिंदे त्यांचे बंधू रमेश शिंदे या भागात तळ ठोकून आहेत. माळशिरस, माण व खटाव तालुक्‍यांत राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. ही ताकद आजपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात असल्याने याचा राजकीय परिणाम फारसा दिसून आला नव्हता. 

सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कसब संजय शिंदे यांच्याकडे असल्याने आणि दिलेली साथ खंबीरपणे शेवटपर्यंत पार पाडण्याची ताकद शिंदे यांच्याकडे असल्याने या तालुक्‍यांत येत्या काळात राजकीय चमत्कार घडण्याची शक्‍यता आहे.

दुष्काळी भागाला शरद पवारांची आठवण
केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम करताना शरद पवार यांनी २००९ ते २०१४ या कालावधीत या मतदारसंघात मुबलक छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर व फळबागा जगविण्यासाठी टॅंकर दिले होते. आज भीषण दुष्काळ असताना या भागात काहीच उपाययोजना नाहीत. फळबागायतदार आणि दूध उत्पादकांचा मतदारसंघ म्हणून माढ्याकडे बघितले जाते. मोदी व फडणवीस सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाचा असंतोष जनतेत आहे. पवारांनी घेतलेले निर्णय व केलेल्या उपाययोजना यंदाच्या दुष्काळात जनतेला प्रकर्षाने आठवत आहेत.

माढा, करमाळा रडारवर
शिंदे बंधूंनी माळशिरस, माण, खटावमध्ये लक्ष घातल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा व करमाळा तालुक्‍यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विजयसिंह व रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी या तालुक्‍यातील शिंदे विरोधकांची मोट बांधली आहे. करमाळा आणि माढ्यात संजय शिंदेंचे मताधिक्‍य कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. करमाळ्यात आमदार नारायण पाटील व माढ्यात आमदार तानाजीराव सावंत यांची मिळणारी साथ ही त्यांच्यासाठी मोलाची असणार आहे.

Web Title: Madha constituency NCP candidate Sanjay Shinde campaign in Mann and Akluj area