Loksabha 2019 : म्हाड्यात कोण होणार रण'जीत' अन् कोणाचा होणार 'मामा'? 

संजय जगताप 
रविवार, 14 एप्रिल 2019

माढ्याच्या रणांगणात तब्बल एकतीस उमेदवार लढण्यासाठी सज्ज झाले असले तरी खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे या दोघांचीच नावे चर्चेत आहेत.

मायणी : माढ्याच्या रणांगणात तब्बल एकतीस उमेदवार लढण्यासाठी सज्ज झाले असले तरी खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे या दोघांचीच नावे चर्चेत आहेत. वियजश्री खेचुन आणण्यासाठी दोघांच्याही राजकीय मेळाव्यांना उधाण आले आहे. अद्यापही काही नेते व प्रमुख कार्यकर्त्यांचे इनकमिंग व आऊटगोईंग सुरू असल्याने राजकीय वातावरण ढवळुन निघत आहे. निवडणुकीच्या 'रणात' कोणाची 'जीत' होणार अन् कोणाचा 'मामा' होणार याबाबत राजकीय वर्तुळात आडाखे बांधले जात आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार संघातुन आधी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर माघार घेतली. त्यामुळे देशभर माढा चर्चेत आला. पराभवाची चिन्हे दिसु लागल्याने पवार यांनी माघार घेतल्याचा सनसनाटी आरोप करुन विरोधकांनी आता आपण जिंकलोच अशा अविर्भावात आततायीपणे भावना, प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र, अनेक राजकीय जाणकारांनी मुत्सदी पवारांची ती राजकीय खेळी असल्याचे म्हटले. अनेक खलबते होऊन राष्ट्रवादीकडुन संजय शिंदे यांची तर भाजपाकडुन रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झाली. दोन्ही उमेदवार नवखे असले तरी त्यांच्यातील लढत प्रतिष्ठेची झाली आहे. माढ्यात कोण होणार रण'जीत' अन् कोणाचा होणार मामा अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यासाठी आडाखे बांधले जात आहेत.

माढ्यात सोलापूरातील करमाळा, माळशिरस, माढा व सांगोला हे चार विधानसभा मतदार संघ तर साताऱ्यातील माण व फलटण या दोनच मतदार संघाचा समावेश आहे. त्यामुळे साहजिकच स्वजिल्ह्यातील उमेदवार म्हणुन होणारा फायदा तुलनेने संजय शिंदेना अधिक होणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसमधुन आलेले असल्याने त्यांचा भाजपच्या सोलापूर जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्याशी पुरेसा परिचय नाही. त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडच्या काळात पक्षापेक्षा विकासकामे, लोकांशी असणारा संपर्क व उमेद्वार कोण आहे हे पाहुन मतदान करण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे नवख्या मतदारसंघात तोंडओळखही नसलेल्या नाईक निंबाळकरांच्या पदरात मतदार कितपत मते टाकतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तीच समस्या संजय शिंदेंना माण व फलटण मतदारसंघात निर्माण होणार आहे. शिंदेंच्या तुलनेत नाईक निंबाळकरांना खुद्द फलटणमध्ये मताधिक्य मिळू शकते. 

काँग्रेसचे माणचे आमदार जयकुमार गोरेंनी तर राष्ट्रवादीच्या विरुद्ध उघडपणे शडडू ठोकला आहे. कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या पाठीशी ताकद उभी करणार असल्याचे त्यांनी लोकांकडुन वदवुन घेतले आहे. ती नाईक निंबाळकरांसाठी जमेची बाजू आहे. मात्र, आमदार गोरेंनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचे पारंपारिक विरोधक असलेले खटाव-माणमधील भाजपचे निष्ठावंत नेते व कार्यकर्ते सावध पवित्रा घेऊ लागलेत. त्याचा फटका बसू शकतो. त्याउलट खटाव-माण व फलटणमधील राष्ट्रवादी एकसंघ आहे. त्याचा फायदा शिंदेंना होऊ शकतो. मोहिते-पाटील पिता पुत्र भाजपच्या वळचणीला जाऊनही भाजप पक्षश्रेष्ठीनी त्यांना चुना लावला. अर्थातच त्यामुळे मोहिते पाटलांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते नाराज आहेत. ते भाजप उमेद्वाराच्या झोळीत मते टाकतील का असाही सवाल उपस्थित केला जात आहे. भाजपामध्ये झालेल्या नेते, कार्यकर्त्यांच्या इनकमिंगचा फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची चिन्हे असल्याचे आडाखे बांधले जात आहेत. परिणामी माढ्याचा गड सर करण्यासाठी कोण, कोणाला, किती व कशी रसद पुरवणार आहे. तसेच, माढ्याच्या रणांगणात कोण रण'जीत' होणार आणि कोणाचा 'मामा' होणार हे पाहण्यासाठी अर्थातच वेट अॅण्ड वॉचशिवाय पर्याय नाही.

Web Title: Main fight between the BJP and the NCP is in Mhada constituency