Loksabha 2019 : विकासाचे मुद्दे नसल्याने गांधी, पवार कुटुंबावर टीका : हर्षवर्धन पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

भाजप नेत्यांनी आत्मविश्‍वास गमवला असून, एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (ता. 11) केली. 

औरंगाबाद : केंद्र व राज्यातील भाजप सरकराने जनतेला भलीमोठी आश्‍वासने दिली. गेल्या साडेचार वर्षांत एकाही आश्‍वासनाची पूर्तता करता आली नाही. प्रचारात सांगण्यासारखे काहीच नसल्याने आता गांधी, पवार कुटुंबियांवर टीका केली जात आहे. भाजप नेत्यांनी आत्मविश्‍वास गमवला असून, एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (ता. 11) केली. 

पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, राज्यातील प्रत्येक घटक सरकारवर नाराज आहे. शेतकरी, व्यापारी, तरूणांमध्ये असंतोष आहे. तो येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतून बाहेर पडेल. फरवेगिरी करणारे सरकार नको, अशी जनतेची भावना असून, गेल्या दहा दिवसात महाआघाडीच्या बाजून वातावरण तयार झाले आहे, असा दावा त्यांनी केला. पत्रकार परिषदेला माजीमंत्री अनिल पटेल, प्रकाश मुगदिया, प्रा. रविंद्र बनसोड, माजी आमदार एम. एम. शेख, डॉ. पवन डोंगरे यांची उपस्थिती होती. 

प्रकाश आंबेडकर भाजपटी "बी टीम' 
मतांचे विभाजन होऊ नये म्हणून महाआघाडीसाठी कॉंग्रेसने पुढाकार घेतला. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सात बैठका झाल्या. त्यांना 10 जागा सोडण्याची तयारी झाली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी 22 जागांची मागणी केली. महाआघाडीसोबत त्यांना यायचे नव्हते. भाजपची "बी टीम' म्हणून ते काम करत आहेत, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे, असे पाटील म्हणाले. 

वीस वर्षांत खैरेंनी काय केले? 
शिवसेनेचे चंद्रकांत खैरे वीस वर्षांपासून खासदार आहेत. त्यांनी औरंगाबाद शहरासाठी काय केले? असा प्रश्‍न पाटील यांनी केला. ते संसदेत कधी बोलल्याचे दिसले नाही. कचरा, पाणी समस्या व शहराच्या अधोगतीला खैरेच जबाबदार आहेत, अशी टीका पाटील यांनी केली. 

सत्तारांसाठी दारे बंद 
बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी मीच पक्ष सोडला आहे, असे स्वतःच सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा करण्याची गरज काय? असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. पक्षापेक्षा कोणी मोठे नाही, असा टोला त्यांनी यावेळी मारला. 

Web Title: Modi dont have points of development thats why they criticizes Pawar and Gandhi says Harshawardhan Patil