Loksabha 2019 : भाजप आमदार म्हणतात, 'मतदान केंद्रांवर मोदींनी लावलेत कॅमेरे'

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- कमळाचे चिन्ह असेल. ते पाहूनच बटण दाबा

- कोणतीही चूक होऊ देऊ नका

गांधीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. काही नेत्यांकडून जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले जात आहे. या अशा नेत्यांना निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जात आहे. असे असताना आता गुजरातमधील भाजप आमदार रमेश कटारा यांनी सांगितले, की ''कमळाचे चिन्ह असेल. ते पाहूनच बटण दाबा. कोणतीही चूक होऊ देऊ नका. कारण यावेळी मोदी साहेबांनी मतदान केंद्रांवर कॅमेरे लावले आहेत''.

रमेश कटारा हे फतेहपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. दाहोद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जसवंत भाभोर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत कटारा बोलत होते. ते म्हणाले, ''ईव्हीएमवर (मतदान यंत्र) जसवंत भाभोर यांचा फोटो असेल. त्यांच्या नावासमोर कमळाचे चिन्ह असेल. ते पाहूनच बटण दाबा. कोणतीही चूक होऊ देऊ नका. कारण यावेळी मोदी साहेबांनी मतदान केंद्रांवर कॅमेरे लावले आहेत. तुम्ही भाजपऐवजी काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्यास ते कॅमेऱ्यात दिसेल आणि कोण काँग्रेसी आहे ते कळेल. मोदीसाहेब तुमचा फोटो पाहतील आणि मग तुम्हाला काम मिळणे बंद होईल''.

दरम्यान, समाजात तेढ निर्माण होतील, असे विधान करणाऱ्या नेत्यांविरोधात निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जात आहे. त्यानंतरही आता भाजप आमदारांकडून अशाप्रकारचे वक्तव्य केले गेले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Modi govt fitted CCTV in polling booths says Ramesh Katara