Loksabha 2019 : मोदींनी अडवानींना चप्पल मारून काढले बाहेर : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

- गुरुला नमस्कार करणे ही परंपरा

-  'न्याय' योजना गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करेल

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु म्हणजे लालकृष्ण अडवानी. आपल्या गुरुला नमस्कार करणे ही परंपरा आहे. मात्र, मोदींनी त्यांना कधी नमस्कार केला नाही. याउलट मोदींनी त्यांना चप्पल मारून बाहेर काढले, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर आज (शुक्रवार) निशाणा साधला.  

चंद्रपूर येथे आयोजित प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी केलेल्या नोटाबंदीने कोणाचाही फायदा झालेला नाही. फायदा झाला अशी एकही व्यक्ती नाही. मोदींच्या 'मेक इन इंडिया' मोहिमेची वाट लागली. त्यांनी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, 15 लाख देणं शक्य नाही. मात्र, आमची 'न्याय' योजना गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करेल. आम्ही देशातील सर्वांत गरिबांना 72 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.    

तसेच ते पुढे म्हणाले, काँग्रेसच्या दबावामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफ झाली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास नीरव मोदी, अनिल अंबानी यांच्याकडून कर्ज वसूली करून 72 हजार रुपये गरिबांना देण्यात येतील. 'न्याय' योजनेमुळे पैसे थेट तुमच्याकडे जातील. तसेच पंतप्रधान मोदी जिथे कुठे जातात. तिथे पैशांची गोष्टी करतात. 

दरम्यान, आजचा दिवस हा बंधूभावाचा ऐक्याचा दिवस आहे. आता आपल्याला एकत्र येऊन देशाला पुढे न्यायचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

Web Title: Modi has thrown LK Advani out by slapping sliper says Rahul Gandhi