काँग्रेसला खरचं लढायचं आहे तर...! 

संभाजी पाटील 
मंगळवार, 2 एप्रिल 2019

माजी आमदार मोहन जोशी या जुन्या जाणत्या चेहऱ्याला संधी देऊन पक्षाने भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला, हे सर्वात महत्त्वाचे. यानिमित्ताने काँग्रेस भवनमध्ये निष्ठावंतांचा झेंडा फडकला आता जोशी आणि त्यांचे सहकारी गिरीश बापट यांचा मुकाबला कसा करतात हे महत्त्वाचे ठरेल. उमेदवारी देण्यावरून पक्षात जो काही खल सुरू होता, आणि पक्षाच्यावतीने जी काही नावे पुढे येत होती, त्यावरून पक्षाने अद्याप कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही असे वाटत होते.

पुण्याच्या बालेकिल्ल्यात गेली पाच वर्षे सपाटून मार खाल्ल्याने "या काँग्रेसला झालंय तरी काय', असा प्रश्‍न सातत्याने कार्यकर्त्याला पडत होता. अंतर्गत बंडाळी, तेच ते नेते, "मासबेस' नसणाऱ्यांना आमदारकी आणि इतर संधी, नव्या कार्यकर्त्यांशी तुटलेली नाळ, विशिष्ट पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस भवन मध्ये निर्माण झालेला कंपू यामुळे काँग्रेसला काही केला ऊर्जितावस्था येत नव्हती. काँग्रेसला आता लढायचेच नाही, अशीच एक प्रकारची मानसिकता तयार झाली होती. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही उमेदवारीचा जो काही घोळ झाला, त्यावरून पक्षाला स्वतःला सावरण्यात काहीही रस नसल्याचे दिसून येत होते. मात्र, उमेदवारीचा अंतिम निर्णय हा "देर आये, दुरुस्त आये' असा म्हणावा लागेल. आता काँग्रेस निष्ठावंत एकमेकांना किती साथ देतात हा उत्सुकतेचा भाग आहे.

माजी आमदार मोहन जोशी या जुन्या जाणत्या चेहऱ्याला संधी देऊन पक्षाने भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला, हे सर्वात महत्त्वाचे. यानिमित्ताने काँग्रेस भवनमध्ये निष्ठावंतांचा झेंडा फडकला आता जोशी आणि त्यांचे सहकारी गिरीश बापट यांचा मुकाबला कसा करतात हे महत्त्वाचे ठरेल. उमेदवारी देण्यावरून पक्षात जो काही खल सुरू होता, आणि पक्षाच्यावतीने जी काही नावे पुढे येत होती, त्यावरून पक्षाने अद्याप कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही असे वाटत होते. पण अखेरच्या क्षणापर्यंत चाललेल्या मंथनातून पक्षाने "निष्ठावंत' असे बिरुद पाठीशी असणाऱ्या जोशी यांना संधी दिली आणि पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील टीकाकारांची तोंड बंद केली. या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षात आयाराम-गयारामची उलाढाल मोठी झाली आहे. सत्ताधारी पक्षाकडे ती नेहमीच जास्त प्रमाणात असते, तशी भाजपमध्येही झाली. पण "निवडून येण्याची क्षमता' हाच निकष सर्वांनी पाळला. त्यासाठी निष्ठा वगैरे असल्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित असणाऱ्या संकल्पनांना थारा देण्यात आला नाही.

पुण्यात भाजपची स्थिती मजबूत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेत "शत-प्रतिशत' यश मिळविल्याने पक्षाचा आत्मविश्‍वास बळावला आहे. त्यात पालकमंत्री गिरीश बापट या पक्षातील सर्वात मुरब्बी राजकारण्याला पुण्याच्या मैदानात उतरवून भाजपने कोणताही धोका पत्करला नाही. बापट यांनी लोकसभा डोळ्यासमोर ठेवूनच गेली पाच वर्षे पुण्यात काम केले आहे. अशावेळी उमेदवारापासून सर्वच जुळवाजुळव करणारा कॉंग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसच्यावतीने अनेक नावे पुढे आली खरी पण शेवटी जोशी यांनी बाजी मारली, ती पक्षांतर्गत खेचाखेचीतूनच.

भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांनी आधी भाजपमध्ये आणि नंतर काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा कोठेच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. शेकाप, संभाजी ब्रिगेड असा प्रवास करून कॉंग्रेसवासी होऊ पाहणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्या नावाची मोठी हवा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ, हार्दिक पटेल, खासदार राजीव सातव आदींनी राहुल गांधी यांच्याकडे केलेली शिफारस यामुळे कॉंग्रेस गायकवाड यांच्या रूपाने "सोशल इंजिनिअरिंग'चा प्रयोग करणार असे वाटत होते. पण निष्ठावंतांनी हा प्रयोग यशस्वी होऊ दिला नाही. गायकवाड यांच्यारुपाने काँग्रेसला नवीन चैतन्य आणण्याची संधी होती. माजी आमदार मोहन जोशी हे गेली काही दिवसांपासून उमेदवारीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होते. मोहनदादा उमेदवारी खेचून आणणार अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना खात्री होती. स्वतः जोशी आपल्या उमेदवारी बाबत सुरवातीपासून ठाम होते. पण बापट-जोशी अशी लढत झाली तर काय होईल अशी शंका कॉंग्रेसच्या मनात होती. त्यामुळे त्यांचे नाव सुरवातीला मागे पडले. 

पुण्यात मराठा- ब्राम्हण अशी लढत झाली तर मराठा आणि एकूणच बहुजन समाज एकवटून तो कॉंग्रेसला मतदान करेल, अशी काही जणांची समजूत (खुळी का असेना) आहे. त्यादृष्टीनेही शिंदे आणि गायकवाड या नावांची चर्चा अखेरपर्यंत रंगली . शिंदे कामाला लागले. गायकवाड कॉंग्रेस मध्ये दाखल झाले. पण बाजी जोशी यांनी मारली.
पुण्यावर निर्विवाद सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसला गेली काही वर्षांपासून जी उतरती कळा लागली त्याला, भाजपची वाढ हा घटक जसा कारणीभूत आहे, त्यापेक्षाही कॉंग्रेसमधील योग्य नेतृत्वाचा अभाव हे कारण जबाबदार होते. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या अटकेनंतर पुण्यातील कॉंग्रेसवर पकड असणारे नेतृत्व उरले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षाची सत्ता असताना आणि नसतानाही त्याच त्या चेहऱ्यांना पदे मिळाली, या कंपूच्या बाहेर सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी मिळाली नाही. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाची पुढची पिढी कॉंग्रेसमध्ये तयार होऊ शकली नाही. त्याचा फटका पक्षाला बसला. जोशी यांना हे चित्र बदलावे लागेल. कॉंग्रेस भवनचे "कल्चर' त्यांना जवळून माहिती आहे, त्यामुळे निवडणूक यंत्रणा उभी करणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी समन्वय साधणे त्यांना अधिक सुलभ होणार आहे. पुण्यातील राष्ट्रवादी निवडणुकीच्या काळात पुण्यात राहील याची दक्षता त्यांना घ्यावी लागेल.

पुण्यातली लढाई काँग्रेससाठी अवघड आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही, पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या पद्धतीने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे, त्यावरून कॉंग्रेसला खरेच लढायचे आहे, हे मात्र स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्याची लढत रंगतदार आणि देशभरात चर्चेची होईल, यात निष्ठावंतांची भूमिका निर्णायक असेल, यात शंका नाही. अन्यथा निष्ठावंत या शब्दाची चेष्टा होईल.

Web Title: Mohan Joshi Congress candidate for Pune Loksabha constituency