Loksabha 2019 : 'हर हर महादेव'च्या घोषणेत भाजप प्रवेशाचे रणशिंग

Loksabha 2019 : 'हर हर महादेव'च्या घोषणेत भाजप प्रवेशाचे रणशिंग

अकलूज : ताकाला जाऊन मोगा कशाला दडवायचाय. निर्णय झालेलाच आहे. त्यामुळे आपण आता घोषणा देऊ या, असे म्हणत करमाळ्याच्या सविताराजे यांनी 'हर हर'चा नारा दिला आणि उपस्थित कार्यकत्यानी महादेव असा प्रतिसाद दिला. 'हर हर महादेव'च्या घोषणा देत मोहिते-पाटील समर्थकानी भाजप प्रवेशाचे रणशिंग फुंकले.

मोहिते-पाटील समर्थकाची येथे बैठक सुरु आहे. या बैठकीला माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेकापचे पदाधिकारी व मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचा दांडगा उत्साह येथे दिसून येत आहे.

कोणत्याही परिस्थितीत रणजितसिंहानी लोकसभेची निवडणूक लढवली पाहिजे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह सुरु आहे. आपल्या भावना व्यक्त करताना अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजित पवार आणि त्यांच्या नितीवर टीका करुन आता राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवा, असे सांगत आहेत.

यावेळी बोलताना सविताराजे म्हणाल्या, राष्ट्रवादीमध्ये मोहिते पाटलांच्या झालेल्या अपमानाचा बदला जनताच घेणार आहे. उशीर झालाय पण आता योग्य निर्णय झाला आहे. डॉ. अमोल घाडगे म्हणाले, भाजप हा सुशिक्षितांचा, नवतरुणांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे रणजितसिंहांनी भाजप मध्ये गेलेच पाहिजे. ते विक्रमी मताने विजयी होतील यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अख्तराज पटेल यांनी मोहिते पाटलांच्या निर्णयाचे समर्थन केले. 'हमसे थी. राष्ट्रवादी', 'राष्ट्रवादी से हम नही'. 'हमे मिटाने का दम, शरद पवार में नही', अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या धोरणांची खिल्ली उडवली. 

यावेळी बोलताना सहकार महर्षि कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले,  मी कधीही राष्ट्रवादीचा सदस्य नव्हतो. मी विजयदादांचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीमध्ये राहायचे की नाही हे विजयदादांनी, रणजितदादांनी ठरवावे. त्यांनी कोणता निर्णय घ्यावा, याबाबत तुम्ही मते मांडा. तुम्हा सर्वांचे जे मत आहे ते दादांचे मत आसेल आणि दादांचे जे मत असेल तेच माझे मत आहे. निवडणुकीचा निर्णय नंतरचा आहे आता तुमची मते मांडा अशी त्यांनी सूचना केली. 

या बैठकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

यावेळी डॉ संदीप पोळ, भरतेश गांधी, विलासराव माने, सतिश देशमुख, संतोष देवकते, जयप्रकाश बिले, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष दीपक पवार, दीपक वाडदेकर आदीनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला खासदार मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, राजसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, धैर्यशिल मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह मोहिते-पाटील परिवारातील सदस्य उपस्थित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com