सलग पाचवेळा खासदारकीची टर्म

सलग पाचवेळा खासदारकीची टर्म

आणीबाणीनतंर काँग्रेस हारली. जनता सरकार सत्तेवर आले; पण ते केवळ तीन वर्षे टिकले आणि १९८० मध्ये पुन्हा लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. काँग्रेसच्या हुकूमशाही पर्वाला कंटाळून लोकांनी त्यांना पराभूत केले. जनता सरकारच्या हातात सत्ता दिली; पण आपसात भांडतच जनता पक्षाची सत्ता तीन वर्षांत गुंडाळावी लागली.

१९८० च्या निवडणुका जाहीर झाल्या आणि काँग्रेसतर्फे उदयसिंगराव गायकवाड यांचे  नाव जाहीर झाले. माजी आमदार, माजी मंत्री व जिल्ह्यात पहिल्यापासून काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या उदयसिंगरावांना तसा पक्षातून फारसा विरोध असण्याचा प्रश्‍न नव्हता आणि जनता पक्षाच्या फुटीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसलाही ही निवडणूक फारशी अडचणीची नव्हती. 

या पार्श्‍वभूमीवर उदयसिंगराव गायकवाड यांच्या विरोधात पुन्हा माजी खासदार दाजीबा देसाई शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर उभे राहीले. वास्तविक काँग्रेसच्या विरोधात विरोधी पक्षांनी एक उमेदवार देणे अपेक्षित होते; पण आणखी एक माजी खासदार राजाराम निंबाळकर थेट दिल्लीहून जगजीवनराम यांच्याकडून जनता पक्षाचे तिकीट घेऊन आले व तेही या निवडणुकीस उभे राहिले. याशिवाय अन्य ९ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

दाजीबा देसाई व निंबाळकर या दोन माजी खासदारांतील मतविभागणीचा फायदा उदयसिंगराव गायकवाड यांना होणार हे एखादा लहान मुलगाही सांगू शकत होता; पण दाजीबा देसाई व निंबाळकर दोघेही तत्त्वाशी ठाम; त्यामुळे मुख्य तीन उमेदवारांत तिरंगी लढत झाली. जनता पक्ष आपसात भांडून कसा संपला, या मुद्‌द्‌यावरच काँग्रेसने प्रचारात भर दिला व निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणेच काँग्रेसच्या बाजूने लागला.

तब्बल १ लाख ५४ हजार ४४३ इतक्‍या मताधिक्‍याने उदयसिंगराव गायकवाड निवडून आले. दाजीबा देसाई व निंबाळकर हे दोन्ही उमेदवार लाख मतांचा टप्पाही गाठू शकले नाहीत.

खासदार म्हणजेच गायकवाड
या निवडणुकीनंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 
काँग्रेसच्या आणि पर्यायाने उदयसिंगराव गायकवाड यांच्याच 
ताब्यात राहिला. त्यानंतर सलग चार लोकसभा निवडणुकांत कोल्हापूरचा खासदार म्हणजेच उदयसिंगराव गायकवाड असाच शिक्का पडून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com