Loksabha 2019 : 'पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे एजंट'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतही मोदींची मैत्री

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना वाटत आहे. तर मग आता तुम्हीच सांगा पाकिस्तानचा खरा एजंट कोण आहे, असा सवाल करत पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे एजंट आहेत, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

आझम खान यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आझम खान यांची प्रचारसभा रामपूर येथे पार पडली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत हे वक्तव्य केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशविदेशातील पत्रकारांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास काश्मीर मुद्द्यावर सकारात्मक चर्चा होऊ शकते, असे वक्तव्य काही दिवसांपासून केले होते. इम्रान खान यांच्या याच मुद्यावरून आझम खान यांनी हे वक्तव्य केले आहे. 

ते म्हणाले, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावे, असे इम्रान खान यांना वाटत आहे. मग लोकांनी सांगावे, की पाकिस्तानचा खरा एजंट कोण आहे. याशिवाय पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतही तुमची मैत्री होती आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीही तुमची मैत्री आहे. 

दरम्यान, तुम्ही आमच्यावर पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप करत आहात, असे सांगत खान यांनी पाकिस्तानचा एजंट मी आहे की कोण आहे? असा सवाल उपस्थित करताच जनतेमधून मोदी-मोदी उत्तर देण्यात आले.

Web Title: Narendra Modi is agent of Pakistan says SP leader Azam Khan