Loksabha 2019 : उस्मानाबाद मतदारसंघात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत टक्कर

सयाजी शेळके
सोमवार, 8 एप्रिल 2019

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न
जिल्ह्यात उद्योगाचा अभाव, रोजगाराचा प्रश्‍न
कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या पाण्यापासून जिल्हा वंचित
उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाला गती नाही

पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने ठाकल्याने उस्मानाबादची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आघाडीचा एकदिलाने प्रचार घडवून मनोमिलन कार्यवाहीत आणणे आणि युतीतील गटबाजी संपवून एकजिनसीपणा दाखविणे दोन्हीही उमेदवारांसमोरचे आव्हान आहे. त्यातच वंचित विकास आघाडीच्या उमेदवारीने भर पडली आहे.

उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये टक्कर आहे. आघाडीमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसची किती मदत होते आणि शिवसेनेची अंतर्गत धुसफूस कशा प्रकारे शांत होते, यावरूनच विजयाचे गणित निश्‍चित होणार आहे. अनेक वर्षांपासून आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून विस्तव जात नव्हता. या निवडणुकीत दोन्ही पक्षांकडील नेते एकदिलाने काम करीत आहेत. असे असले तरी कार्यकर्ते हे नेत्यांचे कितपत ऐकतात, यावर आघाडीची मदार आहे. दुसरीकडे, शिवसेनेत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येत आहे. विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारीत डावलल्याने शिवसेनेतील एक गट नाराज आहे. तो राजेनिंबाळकरांना किती साथ देणार, याकडे नजरा आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांच्यामुळे रंगत वाढली आहे. त्यांना मिळणारी मते सहाजिकच आघाडीची असल्याने ते किती मते खेचतात, हाही औत्सुक्‍याचा भाग आहे.

राष्ट्रवादीचे पाटील आणि शिवसेनेचे राजेनिंबाळकर यांच्यात प्रचारादरम्यान एकमेकांवर कार्टूनच्या माध्यमातून चिखलफेक केली जात आहे. केवळ दोन तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र असलेला तेरणा साखर कारखाना कोणी बंद पाडला, यावरूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. 

वैयक्तिक हेव्यादाव्यांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघत असले, तरी विकासाचे मुद्दे बाजूला जात आहेत. या मतदारसंघात बार्शी (जि. सोलापूर) आणि औसा (जि. लातूर) या विधानसभा मतदारसंघांचाही काही भाग येतो. त्यामुळे त्या दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांवर येथील उमेदवारांना अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने प्रचारात उमेदवारांची पुरती दमछाक होत आहे.

Web Title: NCP Candidate RanaGajitsingh Patil and Shiv Sena candidate Om Prakash Rajneambalkar fight In Osmanabad Constituency