Loksabha 2019 : आदिवासी समाजाच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी : अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

नेरळ : राज्य सरकारने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांच्या समस्यात वाढ करून ठेवल्या असून सर्व बाजूने आदिवासी समाजाची कोंडी या सरकारकडून केली जात आहे. मात्र यापूर्वीचे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आदिवासी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी होती, असा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कशेळे येथील आदिवासी समाजाच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाने जनजागृती मेळाव्याचे आयोजन कशेळे येथे केले होते. त्यावेळी आदिवासी समाजाचे जेष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास विभागाचे माजी मंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या चित्रा वाघ, काँगेस पक्षाचे प्रवक्ते आमदार भाई जगताप, कर्जतचे आमदार सुरेश लाड, शहापुरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती नारायण डामसे, सदस्या अनसूया पादिर, रेखा दिसले, माजी समाजकल्याण सभापती रामचंद्र ब्रह्मांडे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित आदिवासी जनजागृती मेळाव्याचे आयोजन जैतु पारधी, काळूराम पवार, यांनी केले होते, तर प्रास्ताविक बाळकृष्ण पादिर यांनी केले.
 

यावेळी बोलताना अजित पवार यांनी पाच वर्षांपूर्वी केंद्रात आणि साडेचार वर्षांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या सरकार कडून आदिवासी समाजाचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत असा आरोप केला. पेसा कायद्याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचे काम या सरकारने केले असून घटनेने दिलेले 52 टक्के आरक्षणाला छेद देण्याचा प्रयत्न या सरकारने सुरू केल्याचा आरोप करून आदिवासी शेतकऱ्यांची खावटी कर्जे, आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांना देण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा, घसरलेला शैक्षणिक दर्जा याबाबत राज्यपालांना, विधानसभा अध्यक्षांना सांगून देखील काही फरक पडलेला दिसत नाही असे सांगून अजित पवार यांनी मागे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारने सत्ता राबविताना आदिवासी समाजाला मोठा सन्मान दिला होता. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण पहिली पासून देण्याची योजना आमच्या सरकारने राबविली असे सांगून आदिवासींच्या आरक्षणामध्ये अन्य समाजाला घुसविण्याचा सुरू असलेला प्रकार हा आम्ही विरोधी पक्षातील आमदार हाणून पाडत आहोत, पण आपली साथ आम्हाला हवी आहे अशी आर्त हाक अजित पवार यांनी आदिवासी मेळाव्यात दिली.

आदिवासी समाज एकसंघ राहिला तर आपले काही खरे नाही हे या सरकारने ओळखले आहे, त्यामुळे आदिवासी समाजात फूट पाडण्याचे काम शासन करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तर शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा डीबीटी लागू करण्यास विरोध असताना देखील संख्याबळाच्या जोरावर हे सरकार कायदे लादत असल्याचा आरोप त्यांनी केला. परंतु आदिवासी समाजातील वाडी वस्त्यात पिण्याचे पाणी नाही, त्याकडे या सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही, ट्रँकर सुरू करायला वेळ नाही,त्यामुळे आधी हे सरकार सत्तेवर खाली खेचायला हवे यासाठी आदिवासी समाजाने एकगठ्ठा मते आघाडीच्या पारड्यात टाकली पाहिजेत असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com