Loksabha 2019 : 'न्याय' म्हणजे गरिबीवरील 'सर्जिकल स्ट्राइक' : राहुल गांधी

पीटीआय
शनिवार, 27 एप्रिल 2019

जर कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आला, तर कर्ज थकविल्याबद्दल एकाही शेतकऱ्याला तुरुंगाची हवा खावी लागणार नाही. आर्थिक गैरव्यवहार करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्या मदतीसाठी तुम्ही (मोदी) पुढे असता, पण आम्ही सामान्य, शेतकरी व नोकदारांबरोबर उभे आहोत. 

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष 

समस्तीपूर (बिहार) : "न्याय' योजना ही गरिबीवर "सर्जिकल स्ट्राइक' आहे. तसेच नियोजित "किमान उत्पन्न हमी' योजना ही लोकप्रियेतेसाठी नसून सशक्त अर्थव्यवस्थेवर आधारित आहे,'' अशी ग्वाही कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिली. 

"न्याय' योजनेचा भार मध्यमवर्गीय पगारदार व्यक्तींकडून वसूल केला जाईल, अशी जी भीती व्यक्त होत आहे, ती निराधार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने अनिल अंबानी यांच्यासारख्या चोरांकडील पैशातून या योजनेला निधी पुरविण्यात येईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. उत्तर बिहारमधील समस्तीपूरमधील प्रचार सभेत ते बोलत होते. या मतदारसंघातून कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री अशोक राम हे रामचंद्र पासवान यांच्याविरोधात लढत आहेत. रामचंद्र पासवान हे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे बंधू आहेत. लोकभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ते प्रथमच येथे आले होते. या वेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादवही उपस्थित होते. 
बिहारमधील कॉंग्रेस आघाडीतील मित्रपक्ष "राजद'चे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात वाईट वागणूक देण्यात येत असल्याबद्दल राहुल यांनी नाराजी व्यक्त केली.

निवडणुकीत याचा परिणाम चांगला होणार नाही, असा इशारा त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला दिला. वाहतूक कोंडीमुळे सभेला येण्यास उशीर झाल्याने दिलगिरी व्यक्त करीत राहुल यांनी उपस्थितांना उद्देशून "की हालचाल चे' असे स्थानिक मैथिली भाषेत विचारून भाषणाला सुरवात केली. ""नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी आणि विजय मल्ल्या यांच्यासारख्या चोरांना "चौकीदारा'कडून कोट्यवधी रुपये भेट दिले आहेत. जनतेचा 5. 55 लाख कोटी रुपये एवढा पैसा मोदी यांच्या जवळच्या 15 जणांनी लुटला आहे,'' अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NYAY is surgical Strike on Poverty says Rahul Gandhi