Loksabha 2019 : ओमराजे निंबाळकर नायक तर राणा जगजितसिंह खलनायक : गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

- राणा जगजितसिंह पाटील हे खलनायक आहेत तर ओमराजे निंबाळकर नायक

उस्मानाबाद (धाराशिव) : राणा जगजितसिंह पाटील हे खलनायक आहेत तर ओमराजे निंबाळकर नायक आहेत. उस्मानाबाद येथील दहशत संपायची असेल तर ओमराजे निंबाळकर यांना निवडून द्या, असे आवाहन शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी गोऱ्हे यांचा उस्मानाबाद येथे दौरा झाला. या दरम्यान आज शनिवार लिंबाळा दाऊ ता.औसा येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्या बोलताना सरकारने केलेल्या कामांची माहिती देताना सांगितले, की आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका मांडली होती. हे आरक्षण एनडीए सरकारने मान्य करून १०% आरक्षण गोरगरीबांना दिले. मराठा आरक्षण मिळवून देण्यात महत्वाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजवली. तसेच धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाला शिवसेनाच पाठिंबा असल्याचे आमदार गोऱ्हे यांनी सांगितले.

आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात फक्त ८% इतके होते तर शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते आता ५०% च्या वर गेले आहे. महिला सुरक्षेसाठी व आणखी यात वाढ करण्यासाठी व महिला विकासासाठी शिवसेना भाजपचे सरकार आले पाहिजे. यासाठी आपण एकदिलाने काम करण्याची गरज आहे, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. 

महिलांसाठी स्वच्छतागृहे वाढविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
पद्मसिंह पाटील घराण्यावर घणाघाती  टीका करताना गोऱ्हे म्हणाल्या, की राणा जगजितसिंह पाटील हे खलनायक आहेत. तर ओमराजे निंबाळकर हे नायक आहेत. उस्मानाबाद येथील दहशत संपायची असेल तर ओमराजे निंबाळकर यांना निवडून द्यायला हवे. एनडीए सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी असणारे कायदे अतिशय कडक करून महिलांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याचे मी स्वागत करते. देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

ओमराजे निंबाळकर दिल्ली में तर राणा जगजितसिंह पाटील गल्ली में असा नारा आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी भाषणात बोलताना दिला.

यावेळी उमेदवार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार दिनकर माने, भाजपा तालुकाप्रमुख सुभाष जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, भागवत कांबळे, सरपंच विलास नारंगवडे, दौंड उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर, संतोष गोपाळ, अमित माने संचालक मारुती महाराज  सहकारी साखर कारखाना यांच्यासह शिवसेना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Omraje Nimbalkar Hero and Jagjit Singh Rana is Villein says Nilam Gorhe