Loksabha 2019 : पार्थ पवार उमेदवार; आता शिवसेनेची हॅटट्रिक अवघड!

उत्तम कुटे
शुक्रवार, 15 मार्च 2019

अखेर मावळात अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांनाच राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे आता तेथे थेट युती (शिवसेना) आणि आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस) अशीच अटीतटीची लढत होणार आहे.

पिंपरी : अखेर मावळात अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांनाच राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे आता तेथे थेट युती (शिवसेना) आणि आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस) अशीच अटीतटीची लढत होणार आहे. दरम्यान, पार्थ यांच्या उमेदवारीने मावळच्या लढाईचे चित्र आता बदलले आहे. तेथे आता शिवसेनेची हॅटट्रिक होणे अवघड झाले आहे.

राष्ट्रवादीची दुसरी यादी आज जाहीर झाली आणि मावळचा सस्पेन्स संपला. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रमही मिटला. शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी तेथे जवळपास नक्की आहे. फक्त ती जाहीर होणे बाकी आहे. पार्थ यांची निवडणूक लढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मावळात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. तेथील दोन्ही मुख्य उमेदवार म्हणजे बारणे आणि पवार याच समाजाचे आहेत.राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ तेथे मैदानात उतरल्याने ही लढत राज्यात लक्षवेधी होणार आहे. तसेच पवार कुटुंबातील कोणी अद्याप निवडणूक हरलेला नसल्याने या कुटुंबाच्या दृष्टीने ही लढत मोठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

दुसरीकडे बारणेंच्या उमेदवारीला भाजपने यापूर्वीच कडाडून विरोध केला आहे. एवढेच नाही तर या जागी त्यांनी क्लेमही ठोकला आहे. त्यामुळे बारणे उमेदवार राहिले तर,त्यांना विरोध केलेली पिंपरी चिंचवड भाजप त्यांना कितपत मनापासून साथ देईल हा प्रश्नच आहे. या दोन्ही पक्षांत शहरात टोकाचा बेबनाव आहे.

त्यातही शहराचे कारभारी व भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि बारणे यांच्यातून तर विस्तव जात नाही अशी परिस्थिती आहे. त्यात भाजपमध्ये असणार्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीतील दिग्गज मंडळीचीही साथ पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ यांना मिळण्याची दाट शक्यता आहे.परिणामी बारणे यांना पुन्हा खासदार होणे व शिवसेनेची खासदारकीची हँटट्रिक होणे अवघड झाले आहे. त्यासाठी त्यांना आपल्या योजनेत आता बदल करावा लागेल.

बारणे हेच उमेदवार राहिले तर त्यांना भाजपशी पिंंपरी चिंचवडमध्ये जुळवून घेण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. मतदारसंघात असलेले पाच आमदार ही बाब मात्र युती उमेदवाराच्या पथ्यावर पडणार आहे.घाटाखाली प्रबळ असलेल्या शेकापची मदत ही सुद्धा मावळचा निकाल फिरवणारी असेल.

Web Title: Parth Pawar entry in Maval Constituency makes election difficult for Shiv Sena