Loksabha 2019 : प्रसिद्धीसाठीच केली जाते पवारांवर टीका : शरद पवार

रमेश वत्रे
रविवार, 7 एप्रिल 2019

- सुप्रिया सुळे यांनी पाचवेळा धनगर आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित केला

केडगाव : देशात कोणाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यांना बारामतीच्या पवार कुटुबियांवर टीका करावी लागते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच वर्ध्याची सभा आणि पवार कुटुंबीय यांचा काहीही संबंध नव्हता. तेथे ना बारामतीचे लोक होते ना पुण्याचे. बारामतीवर जे बोलले जाते ते देशात चालते, असेही ते म्हणाले. 

शरद पवार यांनी आज पाटस, केडगाव, यवत आणि सहजपूर येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, ताराबाई देवकाते, राणी शेळके, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, मधुकर दोरगे, रामभाऊ टुले, कुंडलिक खुटवड, गणेश कदम, सुशांत दरेकर, जितेंद्र बडेकर, राजाराम कदम, सरपंच नंदा भांडवलकर, सरपंच रझिया तांबोळी आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे पवार कुटुंबियांवर टीका केली होती. वर्धा ते पुणे हे 750 किलोमीटरचे अंतर आहे. पुणे किंवा बारामती येथे माझ्यावर टीका झाली. तर मी समजू शकतो. वर्ध्याची सभा आणि पवार कुटुंबीय यांचा काहीही संबंध नव्हता. तेथे ना बारामतीचे लोक होते ना पुण्याचे. बारामतीवर जे बोलले जाते ते देशात चालते. 

धनगर समाजाने बारामती येथे आरक्षणासाठी उपोषण केले. मला कळत नाही, की त्यांनी बारामती का निवडले? खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत पाच वेळा धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत आरक्षण असे सांगितले होते. मात्र, त्याचे काय झाले हे तुम्हाला माहीत आहे. 'लबाडा घरचे आवतण जेवल्याशिवाय खरं नसते', असा टोला पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples Criticizes on Pawar Family for publicity says Sharad Pawar