Loksabha 2019 : भाजप-सेनेच्या सभेत प्रश्‍न विचारल्याने युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-सेना युतीतर्फे जरुड येथे आयोजित सभेत एका युवकाने प्रश्‍न विचारल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

वरुड (जि. अमरावती) -  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-सेना युतीतर्फे जरुड येथे आयोजित सभेत एका युवकाने प्रश्‍न विचारल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जरुडातील गुजरीबाजार चौकात शनिवारी (ता. सहा) उशिरा रात्री प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार अनंत गुढे, आमदार डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर अतुल देशमुख व सोपान ढोले या युवकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, शरद उपसा योजनेचे कर्ज माफ का झाले नाही, असा प्रश्‍न केला. पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ग्रामपंचायत आहे, ते काम सरपंचाचे आहे, असे डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांना अतुल देशमुख या युवकाला घरून उचलले. गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत पोलिस ठाणे गाठले. गावकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मध्यरात्री दीड वाजता युवकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडण्यात आले. 

नेत्यांना जाब विचारण्याचा अधिकार मतदारांना असताना एखाद्याने प्रश्‍न विचारण्यावरून आमदाराने पोलिसांच्या स्वाधीन करणे, हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सोपान ढोले म्हणाले. 

विरोधक घाबरले
सभांमध्ये होणारी गर्दी पाहून विरोधक धास्तावले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. द्वेषभावनेतून जरुडातील एका नेत्याच्या घरातून या तरुणाला पाठवून हा गोंधळ घालण्याचा प्रकार जाणीवपूर्वक घडविण्यात आला. विरोधकांनी हा डाव रचल्याचे आमदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले. 

प्रतिबंधात्मक कारवाई
त्या तरुणाने गोंधळ घातला असल्याची तक्रार आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली होती. या तक्रारीवरून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून जामिनावर सोडण्यात आले, असे ठाणेदार दीपक वानखडे यांनी सांगितले. 

Web Title: The police took the custody of the youth after questioning the BJP-Sena meeting