Loksabha 2019 : एटापल्लीत चार केंद्रांवर आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे 11 एप्रिलला मतदान होऊ न शकलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील एटापल्ली तालुक्‍यामधील चार मतदान केंद्रांवर सोमवारी (ता. 15) मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे 11 एप्रिलला मतदान होऊ न शकलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील एटापल्ली तालुक्‍यामधील चार मतदान केंद्रांवर सोमवारी (ता. 15) मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात जवान तैनात करण्यात आले असून, नक्षलविरोधी अभियान पथक नक्षलवाद्यांच्या विरोधात शोध मोहीम राबवीत आहे. 

एटापल्ली तालुक्‍यातील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी व वांगेतुरी या गावांचे पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत मतदान होणार आहे. 11 एप्रिलला मतदानाच्या आदल्या दिवशी नक्षलवाद्यांनी गट्टा गावानजीक भुसुरुंगाचा स्फोट घडविल्याने संबंधित मतदान केंद्रांपर्यंत निवडणूक पथके पोचू शकली नव्हती. त्यामुळे चारही ठिकाणी मतदान झाले नव्हते.

नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही गडचिरोली जिल्ह्यात 71 टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या दिवशी नक्षलवाद्यांनी धुडगूस घालून तीन ठिकाणी स्फोट घडवून आणला होता, तर एका ठिकाणी उडालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले होते. 
 

Web Title: Polling at four centers today at Atapally