Loksabha 2019 : प्रज्ञासिंह यांच्यासह हेगडे, कतील यांना भाजपकडून नोटीस

शुक्रवार, 17 मे 2019

- भाजप नेतृत्त्वाने घेतली गंभीर दखल. - बजावली नोटीस.

नवी दिल्ली : साध्वी प्रज्ञासिंह, अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची भाजप नेतृत्त्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या सर्वांना पक्षाने नोटीस बजावली आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या या वक्तव्याशी भाजपचा संबंध नसल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मेला (रविवार) होत आहे. मात्र, प्रचारादरम्यान भाजप नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने याची गंभीर दखल घेतली आहे. त्याबाबत अमित शहा म्हणाले, साध्वी प्रज्ञासिंह, अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी केलेली वक्तव्ये ही त्यांचे वैयक्तिक मत आहे. भाजपचा त्यांच्याशी संबंध नाही. त्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागितली आहे.

दरम्यान, या सर्व नेत्यांच्या वक्तव्यांची पक्षाने गंभीर दखल घेतली आली असून, त्यांची वक्तव्ये शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहेत. तसेच शिस्तपालन समितीने या नेत्यांना दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत, असेही अमित शहा म्हणाले.