Loksabha 2019 : बापटांच्या ताफ्यात मर्सिडिझ, पजेरो ! उत्पन्न वाढले सव्वादोन कोटींनी !!

अनिल सावळे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यांनुसार सुमारे दोन कोटी 15 लाख रुपयांनी वाढ झाली आहे.

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यांनुसार सुमारे दोन कोटी 15 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सध्या एकूण सव्वापाच कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री बापट यंदा लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे 3 कोटी 10 लाख 71 हजार रुपये इतकी होती. 

लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या शपथपत्रात बापट यांनी त्यांच्याकडे सव्वापाच कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडील वाहनांच्या ताफ्यात सव्वादोन लाखांची मर्सिडीज बेंझ, 18 लाखांची पजेरो या आलिशान गाड्यांसह आठ लाख रुपये किमतीचे महिंद्रा
ट्रॅक्‍टर आणि एक हजार रुपयांची स्कूटरचा समावेश आहे. तर, त्यांच्या पत्नीकडे 14 लाख 70 हजारांची हुंदाई क्रेटा गाडी असून, त्यांच्या नावे दागिने, मुदतठेवी आणि वाहन अशी एकूण 53 लाखांची मालमत्ता आहे.

बापट यांच्याकडे जडजवाहिर आणि दागिन्यांमध्ये एक लाख 33 हजार रुपये किंमतीचे 40 ग्रॅम सोने तर त्यांच्या पत्नीकडे 120 ग्रॅम सोने (स्त्रीधन) यांचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वीही त्यांच्याकडे जवळपास एवढेच दागिने होते.

बापट यांच्याकडे केवळ 75 हजारांची रोकड आहे. मुंबई येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, संपदा बॅंकेत मुदत ठेवी, बचत खात्यात ठेवी आहेत. तर संपदा बँक, जनता सहकारी बँक, टेल्को आणि विश्‍वेश्‍वर बँकेचे सुमारे 18 हजार रुपयांचे शेअर्स आहेत.

बापट यांच्यावर पाच वर्षांपूर्वी बँकेचे सुमारे 25 लाखांचे कर्ज होते. सध्या त्यांच्यावर स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे आठ लाख रुपयांचे कर्ज आहे. तर पत्नीच्या नावे जनता सहकारी बॅंकेचे सुमारे 9 लाख 81 हजार रुपयांचे वाहन कर्ज आहे.

Web Title: Property of Girish Bapat Increased by Two Crores