विखे पिता-पुत्रांसमोर पेच; नगरमध्ये होणार राजकीय भूकंप

विखे पिता-पुत्रांसमोर पेच; नगरमध्ये होणार राजकीय भूकंप

ज्येष्ठ काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर नगर लोकसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाची उमेदवारी घ्यावी, याचा पेच पडला आहे. 'राष्ट्रवादी' नगरची जागा काँग्रेसला सोडेना आणि डॉ. विखे यांना 'राष्ट्रवादी'मध्येही प्रवेश देईना. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायचीच, असा चंग बांधलेल्या विखे पिता-पुत्रांना आता भाजपमध्ये जावे की पुन्हा नव्याने जिल्हा विकास आघाडीचे रणशिंग फुंकावे, असा प्रश्‍न पडला नसेल, तर नवलच! याबाबत ते पुढील आठवड्यात ठोस निर्णय घेतील, असे सांगण्यात येते.

डॉ. सुजय विखे पाटील गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेसाठी तयारी करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील सर्व तालुक्‍यांमध्ये प्राधान्याने आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून एन्ट्री केली. विविध वयोगटांतील मंडळींना शिबिरांमधील सुविधांचा लाभ त्यांनी जाणीवपूर्वक दिला. आजोबा दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील व वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्कातून तयार झालेल्या नगर लोकसभा मतदारसंघातील 'प्लॅटफॉर्म' सुजय यांना मिळाला; परंतु त्यातही त्यांनी स्वतःची इमेज तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, असेच म्हणावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून सुजय यांनी तालुकानिहाय प्रश्‍न व राजकीय परिस्थिती विचारात घेऊन केलेली जोरदार भाषणबाजी व त्याला मिळत असलेला लोकांचा प्रतिसाद हे त्याचेच द्योतक असल्याचे जाणवते. 

काँग्रेस जागा मिळवीत नाही व राष्ट्रवादी स्वीकारीत नाही, अशा स्थितीत विखे पिता-पुत्रांसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

मतदारसंघातील ही तयारी पाहून आघाडीच्या वाटपात 'राष्ट्रवादी'च्या वाट्याला असलेली नगर लोकसभेची जागा आपल्याला सोडण्यात येईल, अशी खात्री विखे-पिता पुत्रांना असावी; परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरची जागा 'राष्ट्रवादी'लाच राहील, असे वारंवार स्पष्ट केल्यानंतर विखे पाटील यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील वर्तुळापर्यंत मजल मारली; मात्र नगरची जागा काँग्रेसला मिळू शकली नाही. त्यावर सुजय यांनी 'राष्ट्रवादी'त जाण्याचीही तयारी दर्शविली; परंतु त्यांना पक्षात घेण्यासही अनुकूलता दाखविण्यात आली नाही. त्यामुळे सुजय यांनी, 'कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, तरी अपक्ष लढणार' अशी घोषणा अनेक गावांमध्ये केली. त्याचा फायदा काँग्रेसच्या इतर मंडळींनी घेत ही 'वार्ता' श्रेष्ठींना कळविली नसेल, तर नवलच! अर्थात, चिरंजीवांच्या या घोषणांमुळे काहीसे कलुषित झालेले पक्षांतर्गत वातावरण 'पॅच-अप' करण्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनाही मोठी कसरत करावी लागली. काँग्रेस जागा मिळवीत नाही व राष्ट्रवादी स्वीकारीत नाही, अशा स्थितीत विखे पिता-पुत्रांसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

पुन्हा विकास आघाडीचा जन्म? 
सन 1990मध्ये असाच पेचप्रसंग विखे परिवाराच्या संदर्भात निर्माण झाला होता. त्या वेळी सुजय यांचे आजोबा व दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जिल्हा विकास आघाडीची स्थापना करून सत्ताधारी काँग्रेस नेत्यांना शह दिला होता. पक्षाला समांतर यंत्रणा तयार झाली होती. त्यामुळे जिल्हा विकास आघाडीचा मोठा दबदबा दीर्घ काळ टिकून होता. शिवाय, तालुका विकास आघाड्यांची नोंदणीही झाली होती. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यात या आघाडीच्या बॅनरखाली विधानसभा लढविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. तशाच पद्धतीने आता लोकसभा व विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा व तालुका विकास आघाड्यांचा जन्म होण्याची शक्‍यता आहे. 

''आमच्याच पक्षातले उमेदवार आयात करता, मग आम्ही का चालत नाही''

...तर आम्ही का नाही चालत? 
नगर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आतापर्यंत आमदार अरुण जगताप, डॉ. सर्जेराव निमसे, नरेंद्र व चंद्रशेखर घुले, ऍड. प्रताप ढाकणे, डॉ. अनिल आठरे, दादा कळमकर यांच्यासह पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांची नावे चर्चेत होती. त्यांपैकी डॉ. निमसे व घुले यांनी चाचपणी सुरू केली होती. काही जणांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. तथापि, पक्षाने ऐन वेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कट्टर समर्थक अनुराधा नागवडे यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यामुळे 'राष्ट्रवादी'च्या निष्ठावंतांमध्येही नाराजी पसरली. त्या पार्श्‍वभूमीवर विखे यांनी, आमच्याच पक्षातले उमेदवार आयात करता, मग आम्ही का चालत नाही, असा सवाल केला. अर्थात, विखे यांचे राजकीय विरोधक थोरात यांनीच शरद पवार यांच्याशी असलेल्या 'घरोब्या'चा उपयोग करीत हे घडवून आणल्याचा आरोप विखे समर्थक करीत आहेत. त्यामुळे आता काँग्रेस दखल घेत नसल्याने विखे यांना भाजपकडूनही निमंत्रण असल्याचे सांगण्यात येते. 

नागवडेंऐवजी घुलेंचा विचार? 
अनुराधा नागवडे यांना 'राष्ट्रवादी'त घेण्याचे ठरल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश गुरुवारी (ता. 28) मुंबईत ठरला होता. त्या संदर्भात राजेंद्र नागवडे यांच्या पुढाकाराने बुधवारी (ता. 27) प्रवेशाला जाण्यासंदर्भात बैठक सुरू होती. त्याच वेळी अचानकपणे, प्रवेश स्थगित झाल्याचे वृत्त आले. त्याच दरम्यान, पुन्हा चंद्रशेखर घुले यांचे नाव पुढे आल्याची वार्ताही आली. त्यामुळे नागवडे यांच्याऐवजी घुले यांच्या नावाचा विचार होण्याची शक्‍यता निर्माण झाली. त्यामुळे नागवडे यांनाच उमेदवारी देणार की घुले यांना संधी मिळणार, की अचानकपणे सुजय विखे 'राष्ट्रवादी'च्या कळपात दाखल होणार, याबाबत मात्र तर्कवितर्क सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com