Loksabha 2019 : गरिबीवर "सर्जिकल स्ट्राईक' करू : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

"ज्येष्ठांचा आदर व्हायला हवा, पण लालकृष्ण अडवाणींची अवस्था बघून मोदींची ती वृत्ती असल्याचे दिसत नाही. गुरुपुढे झुकण्याचे सौजन्य त्यांच्यात नाही. हा कुठला हिंदू धर्म आहे?,'' असा प्रश्‍न राहुल गांधी उपस्थित केला.

नागपूर : "कॉंग्रेसने 14 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आणि मोदी सरकारने पाच वर्षांत कोट्यवधी लोकांना पुन्हा गरिबीत ढकलले. आमचे सरकार आल्यावर सर्वांत आधी गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करू,' असा नारा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (ता. 4) नागपूरच्या जाहीरसभेतून दिला.

नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नाना पटोले आणि रामटेकचे किशोर गजभिये यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. कस्तुरचंद पार्कवर आयोजित या सभेत राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे सरकार आल्यावर भाजप सरकारच्या "कारनाम्यां'ची चौकशी करण्याचा इशाराही दिला.

"लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारची चौकशी करू. कोणत्याच गैरव्यवहारातून ते सुटू शकणार नाहीत. सगळे चौकीदार तुरुंगात असतील,' असे ते म्हणाले. ते म्हणाले, "देशातील पाच कोटी कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपयांची घोषणा आम्ही घाईगडबडीत केलेली नाही. तज्ज्ञांनी अभ्यास केल्यानंतरच कॉंग्रेसने देशाला हे वचन दिले आहे. अर्जुनाला जसा माश्‍याचा फक्त डोळा दिसला, तसे 5 वर्षांत 3 लाख 60 हजार रुपये गरिबांना देण्याचे लक्ष्य माझ्या डोळ्यापुढे आहे.' आम्ही घोषणा केल्यावर पैसा कुठून आणणार, असा प्रश्‍न भाजपवाले करीत आहेत. त्यावर अंबानी, नीरव मोदी आणि माल्याच्या खिशातून हे पैसे येतील, हेच आमचे उत्तर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण विभागाचा कुठलाही संबंध नसताना व कामाचा कुठलाही अनुभव आणि ज्ञान नसताना अंबानीला जगातील सर्वांत मोठे संरक्षणविषयक कंत्राट देण्यात आले. त्यापेक्षा विदर्भातील एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला दिले असता तर चालले असते. पण, मोदींसाठी अनिल भाई, विजय भाई आणि नीरव भाई महत्त्वाचे आहेत. ते अंबानेंचे कर्ज माफ करू शकतात, पण शेतकऱ्याचे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

"मेड इन विदर्भ'
विदर्भातील शेतकऱ्यांचा माल अमेरिका, इंग्लंड, जपान आणि चीनच्या सुपर मार्केटमध्ये विकला जावा, असे मला वाटते. प्रत्येकवेळी मेड इन जपान, मेड इन चायना दिसण्यापेक्षा "मेड इन विदर्भ' चीनमध्ये दिसावे, यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करेल, असे राहुल गांधी म्हणाले.

नोटबंदीचा पैसा देशाबाहेर
मोदींनी नोटबंदी करण्यापूर्वी बारा वर्षांच्या मुलाला ही कल्पना सांगितली असती तरी त्याने नकार दिला असता. पण, नरेंद्र मोदींना ते लक्षात आले नाही. नोटबंदीचा संपूर्ण पैसा देशाबाहेर गेला. "मेक इन इंडिया'सारखी कल्पना मला मनापासून आवडली होती. पण, तिथेही मोदींनी अंबानी आणि अदानींनाच फायदा करून दिला, अशी टीका राहुल यांनी केली.

मेरे सामने खडे हो जाओ
नरेंद्र मोदींसोबत मी चर्चेला तयार आहे. संपूर्ण देशापुढे त्यांनी पंधरा मिनिटे माझ्यासोबत चर्चेसाठी उभे व्हावे. भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी गेल्या पाच वर्षांत मोदींनी काय केले ते सांगावे. मी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना मोदी चेहरा दाखवू शकणार नाहीत, असा माझा दावा आहे, असे ते म्हणाले.

मुझे रिश्‍ता बनाना है
राहुल म्हणाले, ""दोन-तीन वर्षांचे राजकारण करायला मी आलेलो नाही. मुझे लंबा रिश्‍ता बनाना है. खोटे बोलण्याची मला सवय नाही. पुढची पंधरा वर्षे देशासाठी काम करायचे आहे. मी जे बोलतो, ते प्रत्यक्षात उतरविण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. ''

व्यवसायाची संधी
ते म्हणाले, "या देशातील बेरोजगारीची समस्या मोदी सरकारला दूर करता आली नाही. कॉंग्रेस सरकार प्रत्येक तरुणाला व्यवसाय करण्याची संधी देईल. तीन वर्षापर्यंत कुणाच्याही परवानगीची गरज लागणार नाही. सर्व बॅंका त्यांना मदत करेल.''

हा कुठला हिंदू धर्म?
"ज्येष्ठांचा आदर व्हायला हवा, पण लालकृष्ण अडवाणींची अवस्था बघून मोदींची ती वृत्ती असल्याचे दिसत नाही. गुरुपुढे झुकण्याचे सौजन्य त्यांच्यात नाही. हा कुठला हिंदू धर्म आहे?,'' असा प्रश्‍न राहुल गांधी उपस्थित केला.

72 हजार रुपये महिलांच्या खात्यात
"जाहीरनाम्यात 72 हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा आम्ही केली आहे. हे पैसे 5 कोटी कुटुंबांतील महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. कारण महिलाच देशाच्या पाठीचा कणा आहेत. या शक्तीला बळकट करण्यासाठी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेसह सर्व सभागृहांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये 33 टक्के आरक्षण देऊ,'' असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले

Web Title: Rahul Gandhi criticized Narendra Modi at Nagpur