Loksabha 2019 : बालेकिल्ल्यातच राहुल गांधींची कोंडी; नागरिकत्वासह शैक्षणिक पात्रतेलाच आक्षेप

रविवार, 21 एप्रिल 2019

- ब्रिटिश नागरिकत्व  - शिक्षणावरून वाद 

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शिक्षणावरून भाजपने आता कॉंग्रेसला कोंडीत पकडले आहे. अमेठीतील राहुल यांची उमेदवारीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्यानंतर भाजपच्या टीकेला धार चढली आहे. राहुल यांनी हा वाद निस्तारावा आणि मग निवडणुकीला सामोरे जावे, असे भाजपने म्हटले आहे. आता यावर निवडणूक अधिकारी सोमवारी (ता.22) रोजी निर्णय घेणार आहेत. अमेठीच्या बालेकिल्ल्यात राहुल कोंडीत सापडल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. 

निवडणूक अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे. भाजपचे प्रवक्‍ते जी. व्ही. एल. नरसिंहराव यांनी राहुल यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारातील मजकुराचा हवाला देताना म्हटले आहे, ""गांधी यांच्या वकिलानेच उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंचा वेळ मागितला आहे.

खरंतर कॉंग्रेसने यावर तातडीने उत्तर देणे अपेक्षित होते. राहुल गांधींवरील आरोप गंभीर असून, ते भारतीय नागरिक आहेत की नाही, हे आता ठरवावे लागेल. ते कधीकाळी ब्रिटिश नागरिक बनले होते का? त्यांनीच आता या आरोपांवर बोलायला हवे.'' भाजपच्या या आरोपांवर कॉंग्रेसने मात्र अद्याप उत्तर दिलेले नाही. अमेठीतील अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांनी राहुल यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला आहे. 

आयोगाची माहिती 

या वादावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणूक अधिकाऱ्याला असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले, पण हा अधिकारी शपथपत्रामध्ये नेमके काय लिहिण्यात आले आहे, त्याची सत्यता पडताळून पाहू शकत नाही. एखादी व्यक्ती जर तक्रार घेऊन आली, तर त्याला पीडिताचा पक्ष जाणून घ्यावा लागतो. पण, संबंधित उमेदवाराने शपथपत्रामध्ये लिहिलेल्या माहितीलाच आक्षेप असेल, तर त्या व्यक्तीने न्यायालयामध्ये जायला हवे. यामध्ये तशी आयोगाची भूमिका नगण्यच असते. 

ब्रिटिश नागरिकत्व 

राहुल यांनी 2004 मध्ये ज्या कंपनीत गुंतवणूक केली तिला आपण ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगितले. भारतीय कायद्यानुसार अन्य देशाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्याचे येथील नागरिकत्व संपुष्टात येते. याबाबत कॉंग्रेसच्या अध्यक्षांनीच उत्तर द्यायला हवे. संबंधित ब्रिटिश कंपनीने चुकीचे निवेदन दिले असेल, तर राहुल यांनी तिच्यावर कारवाई करायला हवी. राहुल यांनी 2004 साली सादर केलेले शपथपत्र आणि 2014 मधील शपथपत्र यातील माहिती पडताळून पाहिल्यास त्यांनी माहिती आणि तथ्ये दडविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते, असे भाजपने म्हटले आहे. 

शिक्षणावरून वाद 

राहुल यांनी सुरवातीस केम्ब्रिज विद्यापीठातून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्‍समधून एम.फील केल्याचा दावा केला होता, पण नंतर मात्र त्यांनी डेव्हलपमेंट स्टडीजमधून शिक्षण घेतल्याचे म्हटले आहे. अधिक माहिती अंती राहुल व्हिन्सी आणि राहुल गांधी यांना एका विशिष्ट वर्षात पदवी मिळाल्याचे दिसून येते. राहुल गांधी यांचे विविध देशांत वेगवेगळी नावे होती का, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल, असा टोला राव यांनी लगावला.