LokSabha 2019 : व्यूहरचनेसाठी खलबते; राहुल गांधींनी घेतली शरद पवार यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील संयुक्त प्रचार, दिल्लीत कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यातील समझोत्याची शक्‍यता आणि अन्य काही निवडणूकविषयक मुद्यांवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. महाराष्ट्रातील संयुक्त प्रचाराबाबतचा कार्यक्रम लवकरच निश्‍चित करून त्यानुसार सभांचे नियोजन करण्याची जबाबदारीही काही नेत्यांना देण्यात आली आहे.
 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील संयुक्त प्रचार, दिल्लीत कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यातील समझोत्याची शक्‍यता आणि अन्य काही निवडणूकविषयक मुद्यांवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. महाराष्ट्रातील संयुक्त प्रचाराबाबतचा कार्यक्रम लवकरच निश्‍चित करून त्यानुसार सभांचे नियोजन करण्याची जबाबदारीही काही नेत्यांना देण्यात आली आहे.
 
ईशान्य भारताच्या निवडणूक दौऱ्यावर जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी आज सकाळी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे पाऊण तास झालेल्या या चर्चेच्या वेळी महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीतील मुद्दे तसेच काही राष्ट्रीय विषयांवरही चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने इतर राज्यांमधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल या राज्यांवर विशेष भर देण्यात आला. आम आदमी पार्टीचे नेते संजयसिंह यांनी पवार यांची भेट घेऊन कॉंग्रेसबरोबर समझोता करण्याच्या संदर्भात काही मुद्दे सादर केले होते. त्याची माहिती पवार यांनी गांधी यांना दिली. त्यानुसार दिल्लीचे प्रभारी पी. सी. चाको, अहमद पटेल यांनी त्या मुद्यांच्या आधारे समझोत्याची शक्‍यता पडताळून पहावी असे ठरविण्यात आले. दिल्ली कॉंग्रेसमधील एक मोठा गट "आप'बरोबर समझोता करण्याच्या विरोधात आहे. परंतु समझोता व्हावा, असे मानणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असल्याने कॉंग्रेसपुढे काहीसे पेच आहे. यातून निवडणुकीच्या ऐन तोंडावर पक्षात फाटाफूट होऊ नये अशी कॉंग्रेसची इच्छा आहे.
 
दरम्यान, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही आज पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि सद्यःस्थितीवर चर्चा केली. यामध्ये मुख्यतः पश्‍चिम बंगालमधील राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचे समजले. 

लवकरच प्रचार मोहीम 
महाराष्ट्रातील जागावाटपाची बाब पूर्ण झाल्यानंतर आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे संयुक्त प्रचारसंभांचे आयोजन करणे आणि विविध नेत्यांच्या सभांचा कार्यक्रम आखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले असून येत्या काही दिवसांतच तो कार्यक्रम तयार करून त्यानुसार प्रचारमोहीम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये सभांची संख्या, स्थान निश्‍चित करण्याबरोबरच कॉंग्रेस पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही प्रचारात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे समजले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi meet with Sharad Pawar