Loksabha 2019 : बसवलेला मुख्यमंत्री काहीच बोलू शकत नाही : राज ठाकरे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

राजकीय क्षितिजावरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना हद्दपार करायचे, ही माणसं आम्हाला नकोत.

- राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

नांदेड : गोदावरीचे पाणी एका बाजूने गुजरातला नेले जात आहे. आज आपल्या महाराष्ट्रातील सरकार काहीच बोलू शकत नाही. बसवलेला मुख्यमंत्री काहीच बोलू शकत नाही. त्यासाठी स्वत:हून बसलेला मुख्यमंत्री हवा आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

नांदेड येथे आयोजित प्रचारसभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, दुर्दैवाने हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर तुम्हालाच काही करता येणार नाही. सध्या आपल्या देशासह महाराष्ट्राची परिस्थिती बिकट आहे. राज्यातील 24 हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली गेली. मग तुम्ही केले तरी काय? तसेच 151 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले गेले. तर बीडमध्ये महिलांचे गर्भाशय काढून घेण्याचे काम सुरु आहे, असे सगळं जर होतं असेल तर मग हा 'चौकीदार' करतो तरी काय?, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींबाबत सवाल उपस्थित केला.

दरम्यान, या राजकीय क्षितिजावरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना हद्दपार करायचे, ही माणसं आम्हाला नकोत, त्यामुळे मी इथं आलो आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. 

Web Title: Raj Thackeray Criticizes CM Devendra Fadnavis in Nanded