Loksabha 2019 : लाभार्थ्याला स्टेजवर बोलावून भाजपचा राजकडून पोलखोल 

अशोक मुरुमकर 
सोमवार, 15 एप्रिल 2019

डिजीटल गाव म्हणून घोषीत केलेल्या हरिसालमधील लाभार्थ्याला येथील सभेत स्टेजवर बोलवून राज ठाकरे यांनी भाजप सरकारचा पोलखोल केला.

सोलापूर : डिजीटल गाव म्हणून घोषीत केलेल्या हरिसालमधील लाभार्थ्याला येथील सभेत स्टेजवर बोलवून राज ठाकरे यांनी भाजप सरकारचा पोलखोल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी हरिसाल या गावाच्या स्थितीचा व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर भाजपकडून ठाकरे यांनी खोटा व्हिडीओ दाखवल्याचे सांगत व्हिडीओ प्रसिद्ध केला. एका वृत्त वाहिनीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे हरिसालमध्ये गेले नसल्याचेही सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्री कोणत्या विहीरीवर पाणी काढायला गेले होते, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार उभा केला नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अमित शहा पुन्हा सत्तेत येऊ नयेत, यासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत. नांदेडची सभा झाल्यानंतर सोलापूरातील सभेत ते काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधान मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. हरिसालचा व्हिडीओ दाखवून मुख्यमंत्री त्यावर काय बोलले, तेथील नेमकी काय स्थिती आहे याचा व्हिडीओ दाखवून त्यांनी हरिसालची जाहीरात करणारा गोपाळकृष्ण ऑनलाईन सेंटचा चालक मनोहर खडकेला स्टेजवर बोलवाला.

ठाकरे म्हणाले, डिजीटलची जाहीरात केलेला तरुण कामाच्या शोधात गाव सोडून गेला आहे. हिरसालची जाहीरातही त्या गावात केलेली नाही. मुंबईच्या अजूबाजूला केली आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते त्या तरुणाचा शोध घेत असून आमचे चुकल्याचे सांगत आहेत. ठाकरे यांनी शेतकरी आत्महत्या, नोटबंदी, बेरोजगारी यावरही टीका केली. 

सभेचा खर्च मोजण्यापेक्षा... 
राज ठाकरे यांच्या सभेच्या खर्चाबाबत भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर बोलताना ठाकरे म्हणाले, सभेचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात किती थाप्पा मारल्या त्या मोजा. जी स्वप्न रंगवली होती त्यावर एक अव्वाक्षर सत्ताधारी काढत नाहीत. जवानांच्या नावावर मते मागीतली जात असल्याचेही ठाकरे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray discloses falsehood of BJP schemes in Solapur