Loksabha 2019 : आठवले म्हणतात, 'तुमची झाली युती अन् आमची झाली माती'

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 एप्रिल 2019

'तुम्हाला जेवढी करायची असेल नरेंद्र मोदींवर टीका, पचवायची कशी ते माझ्याकडून शिका'.

नागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे आता त्यांनी भाजपवर आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की 'तुमची झाली युती अन् आमची झाली माती'.

नागपूरात नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आठवले यांनी हे वक्तव्य केले. रामदास आठवले हे रामटेक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट नाकारण्यात आले. उमेदवारी दिली नसल्याची खंत व्यक्त करत ते म्हणाले, 'तुमची झाली युती अन् आमची झाली माती'.  तसेच ते पुढे म्हणाले, नितीन गडकरी विकास पुरुष असून, ते सर्वांचे लाडके नेते आहेत. देशात काँग्रेसकडून भ्रष्टाचार झाला. महायुतीने काँग्रेसविरोधात मोर्चा उघडला आहे. आता राहुल गांधी आमच्यावर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे आता यावरून आठवले म्हणाले, 'तुम्हाला जेवढी करायची असेल नरेंद्र मोदींवर टीका, पचवायची कशी ते माझ्याकडून शिका'.

दरम्यान, रामदास आठवले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई किंवा रामटेक या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती झाली. त्यानंतरच त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. 

Web Title: Ramdas Athawale Talked after Denies Candidacy to Contest Loksabha