Loksabha 2019 : "तुमचा मतदारांवर भरोसा नाय का?' 

संभाजी पाटील  @psambhajisakal 
रविवार, 14 एप्रिल 2019

एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रश्‍नांवर काहीच बोलत नाहीत, अशी टीका करायची. त्याच वेळी स्थानिक पातळीवर विरोधी उमेदवारावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करायची ही प्रचाराची कोणती पातळी म्हणायची? कुणाचा देठ हिरवा की पिवळा, यापेक्षा पुण्यासाठी तुम्ही काय केले, काय करणार, देशपातळीवरील तुमचे धोरण काय असणार, हीच सुज्ञ पुण्यातील प्रचाराची दिशा असायला हवी. दादा आणि भाऊ हे प्रचाराच्या अखेरच्या आठवड्यात हे पथ्य पाळतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. 

एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रश्‍नांवर काहीच बोलत नाहीत, अशी टीका करायची. त्याच वेळी स्थानिक पातळीवर विरोधी उमेदवारावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करायची ही प्रचाराची कोणती पातळी म्हणायची? कुणाचा देठ हिरवा की पिवळा, यापेक्षा पुण्यासाठी तुम्ही काय केले, काय करणार, देशपातळीवरील तुमचे धोरण काय असणार, हीच सुज्ञ पुण्यातील प्रचाराची दिशा असायला हवी. दादा आणि भाऊ हे प्रचाराच्या अखेरच्या आठवड्यात हे पथ्य पाळतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. 

पुण्यातील निवडणूक प्रचार आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोचला आहे. उमेदवारांचा मागचा एक आठवडा हा प्रचाराची यंत्रणा लावण्यातच गेला. पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट आणि माजी आमदार मोहन जोशी अशा दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये लढत आहे. दोघांना पुणेकरांची नाडी चांगलीच माहिती आहे. दोघांची ओळख 'कसलेला कार्यकर्ता' अशीच आहे. गणेशोत्सव असो की पुण्यातील कोणताही सार्वजनिक उपक्रम दोघेही तेवढ्याच उत्साहाने कार्यात हातभार लावणारे कार्यकर्ते. पुणेकरांना काय आवडतं, काय रुजतं, काय खुपतं याची पुरेपूर माहिती दोघांनाही आहे. त्यामुळे पुण्यातील "दादा-भाऊं'चा प्रचार हाही पुणेकरांना शोभेल, असाच असेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. स्थानिक मुद्दे आणि राष्ट्रीय प्रश्‍नांपेक्षा व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करण्याकडे हा प्रचार घसरलेला होता. 

जोशी यांनी तूरडाळीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारावेळी उपस्थित केला खरा; पण त्याला बापट यांना "संसदेऐवजी तमाशाच्या फडात पाठवायला हवे' याची जोड दिली. निवडणुकीत काय मुद्दे उपस्थित करावेत, हा त्या-त्या पक्षाचा, उमेदवाराचा प्रश्‍न आहे; पण ही लोकसभेची निवडणूक आहे, त्यात पुणेकरांच्या अपेक्षा तुम्हा दोघांकडून जास्त आहेत. त्यामुळे मुद्द्यांवरच चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. पुण्याच्या राजकारणात गेली 30-35 वर्षे तुम्ही कार्यरत आहात, त्यामुळे तुम्हा दोघांनाही पुणेकर चांगलेच ओळखून आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने आणखी नव्या ओळखीची गरज वाटत नाही. मुद्दा आहे, तो प्रचारातील विषयांचा. पुण्यात पुढील पाच वर्षांत तुम्ही काय करणार आहात, गेल्या पाच वर्षांत काय झाले किंवा काय झाले नाही, याभोवती हे विषय राहिले तर मतदारांना निवड करणे सोपे जाईल असे वाटते. 

पुण्यातील मतदारांची संख्या वीस लाखांवर आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता लोकसभेला जेमतेम पन्नास टक्‍क्‍यांच्या आसपास मतदान होते. गेल्या निवडणुकीत ते 54 टक्के झाले होते. यंदा ते किमान 60 टक्‍क्‍यांवर जावे, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. जास्तीत जास्त पुणेकर मतदानासाठी बाहेर पडतील ही जबाबदारी सर्वांचीच आहे; पण उमेदवारांचा प्रचार कशा पद्धतीने चढत्या क्रमाने शिगेला जातो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदान कमी झाले तर कोणाला फायदा होतो, कोणाला तोटा होतो, ही जुनी गणिते कॉंग्रेस आणि भाजपला माहिती आहेत. करमणूक करण्यासाठी काही सभा नजीकच्या काळात होणारच आहेत. उमेदवारांनी थेट नागरिकांपर्यंत पोचत आपले वेगळेपण सिद्ध करावे. कोणावर वैयक्तिक टीका केली, भाषणात आरडाओरड केली तरच मते मिळतात, हे खरे नाही. तुमचे काम खणखणीत आहे, मग चिंता कसली. तुमचा मतदारांवर भरोसा नाही का? 

आता पुणे बदललंय! 
आता पुणे बदलले आहे. सव्वा लाखावर नवमतदार यंदा पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यांना पुण्यातील नागरी प्रश्‍न, उच्चशिक्षण, नोकरीच्या संधी, प्रगतीची दारे उघडणारी धोरणं काय असतील, पुण्याचा रोडमॅप कसा असेल, हे ऐकण्यात जास्त रस आहे. 

Web Title: Sambhaji Patil writes About Voters in pune