Loksabha 2019 : शरद पवारांकडून खोट्याचा प्रचार : शहा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 एप्रिल 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भविष्य अंधकारमय असल्यानेच आणि जागांवरून कुटुंबात कलह झाल्यानेच शरद पवार हे खोट्याचा प्रचार करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भविष्य अंधकारमय असल्यानेच आणि जागांवरून कुटुंबात कलह झाल्यानेच शरद पवार हे खोट्याचा प्रचार करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली. 

राफेल करार मान्य नसल्यानेच मनोहर पर्रीकरांनी संरक्षण मंत्रालय सोडले, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला होता. हा संदर्भ घेत शहा यांनी पवारांवर टीका केली. "पवारसाहेब, तुम्ही माजी संरक्षणमंत्री असल्याने तुमच्याकडून अधिक अपेक्षा होत्या. तुमच्या पक्षाला काहीही भवितव्य राहिलेले नाही आणि जागांवरून कुटुंबात कलह निर्माण झाल्याने तुम्हाला नैराश्‍य आले असून, त्यातूनच तुम्ही खोट्याचा प्रचार करत आहात,' असे शहा यांनी ट्‌विट केले आहे.

शरद पवार यांनी 1999 मध्ये कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली आणि काही काळातच पुन्हा कॉंग्रेसबरोबरच आघाडी केली, याचीही शहा यांनी आठवण करून देत पवार यांच्यावर टीका केली. 

Web Title: From Sharad Pawar false Publicity says Amit Shah