LokSabha2019 : कुटुंबच नसणाऱ्यांना त्याचे महत्त्व काय कळणार? : पवार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

मोदींनी आमच्या कुटुंबाबद्दल आत्मीयता दाखविल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे; परंतु कुटुंब नसलेला व्यक्ती आमच्या कुटुंबावर टीका करत आहे. माझ्या कुटुंबाची तुम्ही चिंता करू नका. कुटुंबातील ऐक्‍य हे कुटुंबासाठी महत्त्वाचे असते. ज्यांना कुटुंबच नाही, त्यांनी हे सांगायची गरज नाही.

सोलापूर : ज्या राज्यात भाजप सत्तेत नाही, त्या राज्यात पंतप्रधान प्रचारासाठी गेल्यावर तेथील मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. नेहरू-गांधी घराण्यावर टीका करणारे मोदी आता पवार घराण्यावरही टीका करू लागले आहेत. मोदींनी आमच्या कुटुंबाबद्दल आत्मीयता दाखविल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे; परंतु कुटुंब नसलेला व्यक्ती आमच्या कुटुंबावर टीका करत आहे. माझ्या कुटुंबाची तुम्ही चिंता करू नका. कुटुंबातील ऐक्‍य हे कुटुंबासाठी महत्त्वाचे असते. ज्यांना कुटुंबच नाही, त्यांनी हे सांगायची गरज नाही. त्यामुळे या टीकेकडे आम्ही फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. 

माढ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार आज सोलापुरात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना अपघाताने संधी मिळाली आहे. त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी. त्यांच्या हातात सत्तेचे आणखी सात-आठ महिने आहेत. त्यानंतर समजेल कोण कोणाची चौकशी करतेय. महसूलमंत्री पाटील म्हणजे विनोद आहेत. त्यांच्या विधानांना फारसे गांभीर्याने घेण्याची आवश्‍यकता नाही.'' 

...म्हणून राज ठाकरे सोबत 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देशावर आलेले राजकीय संकट असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली. मोदी-शहा यांना सत्तेवरून घालविण्यासाठी ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. हे संकट घालविण्यासाठी ते आमच्यासोबत आहेत. लोकसभा लढविण्यासाठी त्यांच्या पक्षाने जागांची मागणी केली नसल्याचेही पवार यांनी सांगितले. 

Web Title: Sharad pawar says Those who do not have family they will know the importance of the family