Loksabha 2019 : अखेर मावळात युतीचं जमलं भाऊ, अप्पांचं मनोमिलन झालं

उत्तम कुटे
सोमवार, 8 एप्रिल 2019

पिंपरी चिंचवडमधील एकमेकांचे हाडवैरी असलेले शिवसेनेचे मावळचे खासदार व उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे अखेर रविवारी मध्यरात्री मनोमिलन झाले.

पिंपरी (पुणे) : पिंपरी चिंचवडमधील एकमेकांचे हाडवैरी असलेले शिवसेनेचे मावळचे खासदार व उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे अखेर रविवारी मध्यरात्री मनोमिलन झाले. भाजपचे ट्रबलशूटर आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई पुन्हा एकदा यशस्वी झाली.

या मनोमिलनाने बारणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.ही दिलजमाई गुढीपाडव्याचा मुहूर्तावर होणार असल्याचे व्रुत्त दोन दिवसांपूर्वी फक्त सरकारनामाने दिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या दिलजमाईसाठी प्रयत्न केले. त्यांचे दोन पदाधिकारी या तडजोड बैठकीला उपस्थित होते.महाजन,बारणे, जगताप यांच्यासह शिवसेनेचे आमदार अॅड गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपचे सदाशिव खाडे अमित गोरखे या बैठकीला हजर होते.भाऊंच्या चंद्ररंग बंगल्यावर ती झाली. ती अडीच तास चालली. मध्यरात्री एक वाजता ती संपली. बैठक व मनोमिलनाला बारणे यांनी दुजोरा दिला. मात्र तपशीलवार माहिती आम्ही दोघे पत्रकार परिषदेत दुपारी एक वाजता देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी या दोघांचे सख्य घडविण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत, उपनेत्या डॉ नीलम गोर्हे यांनी प्रयत्न केले होते.महाजन यांनीही दोघांची एकदा नुकतीच भेट घेऊन प्राथमिक तडजोड घडवून आणली होती.दुसऱ्या भेटीत काल ती पूर्णत्वास गेली. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप अप्पा मागे घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर युतीधर्माचे पालन करीत अप्पांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून (लाखाचे) लीड देण्याची घोषणा भाऊ करतील,असे राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

Web Title: Shrirang Barane and Laxman Jagtap come together in Maval Loksabha Constituency