Loksabha 2019 : अखेर सुभाष वेलिंगकर निवडणूक रिंगणात

velingkar
velingkar

पणजी : माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे राजकीय गुरु अशी ओळख असलेले सुभाष वेलिंगकर अखेर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 2017 मधील विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी गोवा सुरक्षा मंच या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. त्या पक्षातर्फे ते पणजीतील विधानसभेची पोट निवडणूक लढवणार आहेत. पर्रीकर यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे.

वेलिंगकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वीचे प्रांत संघचालक, शिशू प्रमुख ते प्रांत संघचालक असा प्रवास त्यांनी केला आहे. 2017 च्या निवडणुकीआधी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना कॉंग्रेसच्या सरकारने दिलेले अनुदान भाजपच्याही सरकारने मागे घेतले नाही म्हणून त्यांनी भाजप सरकारविरोधी भूमिका घेतली. त्या वादातून त्यांना संघ सोडावा लागला आणि त्यांनी भारत माता की जय ही संघाला समांतर पण त्याच तत्वांची संघटना स्थापन केली. त्याआधी माध्यम प्रश्नावर त्यांनी माजी मुख्यमंत्री स्व. शशिकला काकोडकर यांच्यासोबत भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे केले होते. त्यामुळे कॉंग्रेसचे सरकार जाऊन भाजप स्वबळावर 2012 मध्ये सत्तेवर आला होता.

वेलिंगकर यांनी संघ सोडल्यानंतर राजकीय पक्ष काढला होता. त्या पक्षाचे उमेदवार त्या निवडणुकीत फारशी चमक दाखवू शकले नव्हते मात्र कोणतेही आमिष न दाखवता त्यांनी केलेल्या प्रचाराला मतपेटीतून शेकडो जणांनी प्रतिसाद दिला होता.

आता पणजीतील राजकारण स्वच्छ कऱण्यासाठी आपण राजकीय आखाड्यात जिंकण्यासाठीच उतरण्याचे ठरवले आहे असे त्यांनी सांगितले आहे. 1994 मध्ये पणजीवासियांनी म्हापशातील पर्रीकर यांना आमदार म्हणून निवडून दिले. आता पणजीवासिय तशाच कारणांमुळे मूळ पणजीवासिय असलेल्या आपणास निवडून देतील असे त्यांनी सांगितले.

पणजीच्या पोट निवडणुकीत कॉंग्रेसने परवाच पक्ष प्रवेश केलेले माजी मंत्री आतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी दिली असून आम आदमी पक्षाने वाल्मिकी नाईक यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने कॉंग्रेसला या निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नसून त्यांनी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर व पर्रीकर यांचे ज्येष्ठ पूत्र उत्पल पर्रीकर यांच्या नावाचा विचार उमेदवारीसाठी चालवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com