Loksabha 2019 : निवडणूक म्हटलं, की ट्रोलिंग होणारच...! पार्थच्या बचावासाठी आई प्रचाराच्या रिंगणात (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

- पार्थ पवार मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करेल

- पक्षाने तिकीट दिल्याने पार्थ मैदानात

खारघर : आपला मुलगा मोठा व्हावा, त्यानं चांगलं नाव कमवावं, अशी प्रत्येक आईची इच्छा असते. त्याकरिता आईची आयुष्यभर धडपड सुरू असते. सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही असेच काहीसे चित्र दिसत आहे. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा अजित पवार या आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. आपला मुलगा पार्थ पवार यांच्यावर झालेले संस्कार आणि तो मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास आई म्हणून वाटतो, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. 

काही वर्षांपूर्वी राजकारणात महिला फारशा दिसत नव्हत्या. एखाद्याला उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार दुसरेच लोक करायचे. आता वातावरण बदलत चालले आहे. वेगवेगळ्या निवडणुकीत आई, बहीण, पत्नी अशा नातेसंबंधातील महिला प्रचारासाठी बाहेर पडताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षआघाडी उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी त्यांची आई सुनेत्रा अजित पवार यांनी मंगळवार सकाळी साडेनऊपासून पनवेल, कळंबोली, कोपरा, खारघर आदी भागात मित्र पक्षाच्या घरी जाऊन कार्यकर्ते आणि महिलांना भेटी दिल्या.

खारघरमध्ये झालेल्या आपल्या छोटेखानी भाषणात सुनेत्रा पवार म्हणाल्या, की विरोधक हे घराणेशाही तसेच पार्थच्या भाषणावर टीका करताना दिसत आहे. मात्र, पार्थ हे मावळ लोकसभा निवडणूक लढवावी. निवडून आल्यावर आपल्या समस्यांना वाचा फोडेल, ही लोकांची मागणी होती, म्हणून पक्षाने तिकीट दिल्याने पार्थ मैदानात उतरला आहे. त्याला राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले. पार्थच्या भाषणावर विरोधक बोलत आहेत. मात्र,  हे फार मनाला लावून घ्यायचे नसतात. राजकारणात हे होतेच असतात. विरोधकांनी पाच वर्षात काय बदल केले हे जनतेला माहीत आहे.

आपण कधीही नोटाबंदी, जीएसटी हे पाहिले नव्हते. हे जनतेला पाहायला मिळाले. पार्थ हे हुशार आणि मेहनती असून, मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास मला आई म्हणून वाटतो, असे सांगून निवडणुकीच्या दिवशी मतदान करा असेही सुनेत्रा पवार यांनी आवर्जून सांगितले.

पार्थ हा आमचाही मुलगा

सुनेत्रा पवार निवडणुकीच्या प्रचारात मित्र पक्षाच्या घरी जाऊन महिलांची भेट घेतली. पार्थ पवारला मतदान करा, असे सांगताच उपस्थितांमधून ''पार्थ हा आमचाही मुलगा आहे. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू''. 

प्रत्येक निवडणुकीत प्रचारात सहभागी 

पार्थ पवार हा मुलगा आहे. म्हणून नव्हे तर मी प्रत्येक निवडणुकीत प्रचारासाठी उतरत असते. त्यामुळे ही काही पहिलीच वेळ नाही.

Web Title: Sunetra Pawar Participates Election Campaign of Parth Pawar