Loksabha 2019 :...तर निवडणुकीतून माघार : कुल

रमेश वत्रे
रविवार, 14 एप्रिल 2019

दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात विधानसभेत शेतीच्या पाणी प्रश्नावर एकदा जरी तोंड उघडले असेल तर पुरावा द्यावा. मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल.

पुणे : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात विधानसभेत शेतीच्या पाणी प्रश्नावर एकदा जरी तोंड उघडले असेल तर पुरावा द्यावा. मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल. असे खळबळजनक आव्हान आमदार राहुल कुल यांनी थोरात यांना दिले आहे.  

चौफुला ( ता.दौंड ) येथील महाआघाडीच्या युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार रंजना कुल, प्रेमसुख कटारिया, वैशाली आबणे, जयश्री जाधव, गणेश आखाडे, नामदेव बारवकर, दादासाहेब केसकर, हरिष खोमणे, अनिल सोनवणे, आनंद पळसे, संजय इनामके, सुरेश शेळके, प्रशांत गिरमकर, मल्हारी गडधे, अप्पासाहेब हंडाळ, राजेश पाटील, बाळासाहेब तोंडेपाटील, अमोल मारकड, तुकाराम ताकवणे, हरि ठोंबरे उपस्थित होते. 

 पाण्याबाबत कुल यांनी थोरात यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, पाण्याच्या बाबतीत थोरात निष्क्रिय राहिले आहेत. भामा आसखेडचे पाणी नको म्हणून थोरात यांनी आपला वेडेपणा दाखवला आहे.  पाऊस कमी असतानाही नदी आणि नवीन मुठा कालवा, बेबी कालव्याला पाणी देत आहोत. गेली 50 वर्ष बंद असलेला बेबी कालवा पालक मंत्री गिरीश बापट यांनी मदत केल्याने आपण तो पुन्हा चालू शकलो. वीज निर्मितीनंतर मुळशी धरणातील पाणी समुद्राला मिळते. ते पाणी खडकवासला प्रकल्पात आणण्यात येणार आहे. मुळशीचे पाणी आले तर पुढील 50 वर्षांची पाण्याची काळजी मिटणार आहे. थोरात यांच्या काळात 117 कोटी रूपयांची रस्त्यांची कामे झाली. माझ्या काळात हा आकडा नऊशे कोटींवर गेला आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत कुल म्हणाले, बारामती मतदार संघात महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांनी गावातच प्रचार यंत्रणा राबवावी. बंडाच्या बाजुने उभे राहण्याची दौंड तालुक्याची परंपरा आहे.  ती या वेळेस ही टिकून राहील.   

विनातारण विनाकारण कर्जाचे काय
भीमा पाटस कारखान्याला मुख्यमंत्र्यांनी 36 कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. त्याचा हिशेब कुल यांनी द्यावा अशी मागणी थोरात यांनी केली होती. त्यास उत्तर देताना कुल म्हणाले, 36 कोटींचा हिशेब कारखान्यात आहे. तो त्यांनी घ्यावा. मात्र थोरात यांनी कारखान्याचे सर्वेसर्वा असताना विनातारण विनाकारण घेतलेल्या 52 कोटी रूपयांच्या कर्जाचे काय केले. कारखान्याचे विस्तारीकरण 36 कोटींवरून 60 कोटींवर कसे गेले याचेही उत्तर दिले पाहिजे.  

Web Title: Then I will not contests Assembly Election says MLA Rahul Kool