Loksabha 2019 :...तर मोदी जातील तुरुंगात : पृथ्वीराज चव्हाण

माधव इतबारे
शनिवार, 13 एप्रिल 2019

- सरकार बदलल्यास त्रास होईल.

- राफेलची निष्पक्ष चौकशी व्हावी.

औरंगाबाद : ज्यांचे दगडाखाली हात अडकले आहेत, अशा सहकार क्षेत्रातील नेत्यांवर दबाव टाकून भाजप दहशतीचे राजकारण करत आहे. त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेशाचे सोहळे सुरू असून, तुमची प्रकरणे मिटवून घ्या, अन्यथा सरकार बदलल्यास आमच्याकडूनही त्रास होईल, असा सल्ला अनेकांना दिला असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी (ता. 13) सांगितले. तसेच राफेलची निष्पक्ष चौकशी झाल्यास मोदी यांची जागा तुरुंगात राहील, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षांत जनतेला दिलेल्या एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. "सब का साथ, सब का विकास'मधून आता "विकास' गायब झाला असून, निवडणुकीत मोदी वैयक्तिक पातळीवर उतरले आहेत. देशाच्या सैनिकांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करून मते मागत आहेत. "ना खाऊंगा ना खाने दूँगा' अशी घोषणा मोदी यांनी केली होती. मात्र, राफेल विमान खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला. न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. राफेलची निष्पक्ष चौकशी झाल्यास मोदी यांची जागा तुरुंगात राहील, असा दावा चव्हाण यांनी केला.

पक्ष सोडून अनेकजण भाजपमध्ये प्रवेश का घेत आहेत? या प्रश्‍नावर ते म्हणाले, भाजपकडून दहशतीचे राजकारण केले जात आहे. छगन भुजबळ यांना दोन वर्षे जेलमध्ये टाकावे लागले. दबाव टाकूनच शिवसेनेसोबत युती केली. ईडी, सीबीआयचा वापर करून "आमच्याकडे तुमच्याविरोधात पुरावे आहेत. सोबत या अन्यथा कारवाई करू' अशा धमक्‍या दिल्या जात आहेत.

ज्यांचे हात दगडाखाली अडकलेले आहेत. विशेषतः सहकार क्षेत्रातील, साखर कारखान्यासंबंधी नेते त्यात बळी पडत आहेत. "जे प्रकरणे आहेत ते मिटवून घ्या, असा सल्ला मी काहींना दिला आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता, चव्हाण म्हणाले. काँग्रेसच्या जाहीरनाम्याची भाजप नेत्यांनी कितीही टिंगल केली तरी आम्ही ते करून दाखवू, असा दावा त्यांनी केला. 

फ्रान्स सरकारकडून अंबानीला सूट 

राफेल विमान खरेदी गैरव्यवहारातील अनिल अंबानी यांच्या कंपनीला फ्रान्स सरकारने तब्बल 1100 कोटी रुपयांची करातून सूट दिल्याची माहिती समोर आल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

वंचित आघाडीचा पंतप्रधान होणार आहे का? 

मतांचे विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. मात्र त्यांना महाआघाडीसोबत यायचे नव्हते. मोदी यांना मदत करण्यासाठी त्यांनी उमेदवार दिले आहेत. वंचित आघाडीचा पंतप्रधान होणार आहे का? असा प्रश्‍न चव्हाण यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Then Narendra Modi will go to Jail says Prithviraj Chavan