Loksabha 2019 :...तर खैरेंविरुद्ध निवडणूक लढविणार नाही : जलील

योगेश पायघन
गुरुवार, 28 मार्च 2019

लोक म्हणातात मोदी पाहिजे, खैरे नको. पण शहरातील कचरा, पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी दिल्लीतून मोदी येणार नाहीत.

- इम्तियाज जलील

औरंगाबाद : कधीकाळी आशियातील सर्वात वेगाने वाढणारे औद्योगिक शहराला घरघर लागली आहे. वीस वर्षांत केवळ हिंदू मुस्लिम, संभाजीगर की औरंगाबाद, मंदिर मशिद अशा भावनिक मुद्यांवरच इथे निवडणूक लढली गेली. मात्र, आम्ही केवळ विकासाच्या मुद्यांवर लढणार आहोत, असे स्पष्ट करताना विद्यमान खासदारांनी त्यांच्या वीस वर्षाच्या कार्यकाळात आणलेले दहा विकास प्रकल्प आणल्याचे दाखवल्यास खैरेंविरुद्ध निवडणूक अर्ज भरणार नाही, असे आव्हान वंचित बहुजन आघाडी-एमआयएमचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (ता. 28) पत्रकार परिषदेत दिले. 

लोक म्हणातात मोदी पाहिजे, खैरे नको. पण शहरातील कचरा, पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी दिल्लीतून मोदी येणार नाहीत. किंवा कुठल्याही उद्योजकाला औरंगाबादेत येऊन उद्योग सुरू करा, असे सांगणार नाहीत. ती जबाबदारी इथल्या जनतेने निवडून दिलेल्या स्थानिक खासदाराची असते. शहराचे सामाजिक वातावरण जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत शहरात मोठे उद्योग येणार नाहीत. अनेक विमान कंपन्या आपल्या सेवा बंद करत असल्याने एअर कनेक्‍टिव्हीटी तुटत आहे. त्याचा परिणाम पर्यटन व उद्योगावर झाल्यास प्रगती खुंटेल असे इम्तियाज जलील म्हणाले.

मला फक्त पैसाच पराभूत करेल

लोकसभा निवडणुकीत वापर होणाऱ्या पैशांबद्दल मनात भिती आहे. भाजप आपल्या किंवा मित्रपक्षाच्या उमेदवाराला 15 कोटी, तर कॉंग्रेस आपल्या उमेदवाराला 10 कोटी रुपये देणार आहे. त्यामुळे मला जर कुणी हरवू शकेल तर तो पैसा असा दावा करतानाच ही निवडणूक आपण लोक चळवळ म्हणून लढवणार असल्याचे इम्तियाज यांनी सांगितले. 

माझ्यासह सर्वच लोकप्रतिनीधींनी केलेल्या विकासकामांची व गुणवत्तेची चौकशीची मागणीही त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे सर्वचजण सोबत असून योग्यवेळी ते प्रचारात उतरतील. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांना फोनवरुन बोललो प्रत्यक्ष भेटलो. मात्र, राज्यातील कॉंग्रेस भाजपाच्या दावणीला बांधली गेली असल्याने ते असे उद्योग करत असल्याचे सांगताना आमच्या आरोप करणाऱ्यांनी वीस वर्ष लढून सेंटिंगचे राजकारण केल्याचेही ते इम्तियाज म्हणाले.

Web Title: Then will not Contest Election Against Chandrakant Khaire says Imtiyaz Jaleel