Loksabha 2019 : ...म्हणून राज यांच्या सभांना गर्दी

बुधवार, 17 एप्रिल 2019

काय आहे राज ठाकरेंच्या भाषणांत?

का गर्दी करतात लोक?

कुठून येतात?

काय घेऊन जातात?

जाणून घ्या.....

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आज म्हणाले, राज यांच्या सभांना महाराष्ट्राबाहेरूनही मागणी येतेय. नियोजन चाललंय...

त्यांना विचारलं, वारणसीमध्ये सभा घेताय का?

उत्तर आलं, कोलकत्यातून विचारणा झालीय. पाहतोय आम्ही कसं जमतंय ते...

वाराणसीत राज ठाकरे यांची सभा झालीच, तर ती एेतिहासिक ठरेल हे निश्चित. अवघ्या महिनाभरात किमान महाराष्ट्रातल्या राजकारणाचा लँडस्केप राज यांनी पालटून टाकला आहे.

काही आठवड्यांपूर्वी एक ट्विट केलेलं. राज ठाकरेंची महाराष्ट्राला...देशाला आवश्यकता राहणार अशा आशयाचं. प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व भारतात आवश्यक आहे. इथं द्विपक्षीय लोकशाही घातक आहे. वैविध्य जपायचं असेल, तर कुठल्याही पक्षापासून 'मुक्त' भारत चालणार नाही, असा संदर्भ ट्विटमागं होता. मोदीभक्तांच्या स्वाभाविक विरोधी प्रतिक्रिया होत्या. राज म्हणजे बंद गाडीचं इंजिन वगैरे. काँग्रेस नेहमीप्रमाणं गोंधळलेली. काय करायचं, काय नाही असली अवस्था. त्यानंतरच्या टप्प्यात राज यांच्या 'एsss लाव रे व्हिडिओ...'चे शो गाजायला लागले. सभांना पैसे देऊन माणसं भाड्यानं आणण्याच्या काळात राज यांच्या सभेसाठी भली मोठी मैदानं अपुरी वाटू लागली. 

काय आहे राज ठाकरेंच्या भाषणांत?

का गर्दी करतात लोक?

कुठून येतात?

काय घेऊन जातात?

खूप प्रश्न निर्माण झालेत. सोशल मीडियावरच्या चर्चांमध्ये भरून वाहणारे प्रश्न ऑफलाईन गप्पांमध्येही डोकावत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला भुईसपाट करून देशभरातल्या राजकीय पक्षांची हवा काढून घेतली होती, हे मान्य. मोदी प्रभावी, नाट्यमय वक्ते आहेत. त्यांना प्रेझेंटेशनचं स्किल आहे. त्यांच्या भाषणांनी आणि निर्णयांनी विरोधकांमध्ये मोठा व्हॅक्युम निर्माण केला. हे झालं देशपातळीवर. 

 raj thackeray

राज्यात देवेंद्र फडणविसांनी मोदींच्या पावलावर पाऊल टाकलं. मिळेल ती ग्रामपंचायत आणि मिळेल ती महापालिका ताब्यात घेतली. फडणवीस विरोधी पक्षात असताना स्वर टीपेला लावून बोलायचे. तोच खाक्या त्यांनी सुरू ठेवला. जाईल तिथं काँग्रेसला बडवलं. राष्ट्रवादीला आधीच संशयाच्या बुरख्यात दडवून ठेवलं. परिणामी राज्यातही असाच व्हॅक्युम तयार झालेला. मोदी किंवा फडणवीसांना प्रश्नच विचारायचे नाहीत, असं स्वरुप बनलं. आधी विरोधी पक्ष थंड केला आणि मग ट्रोलमार्फत सोशल मीडियावरचा विरोधही.

राज यांनी एकखांबी विरोधी पक्ष उभा केला आणि सोशल मीडियातला विरोधही. 

सत्तेला प्रश्न करण्याची विरोधकांची भूमिका असते. ती ना अशोक चव्हाणांनी निभावली ना धनंजय मुंडेंनी. ती राज यांनी अवघ्या तीन आठवड्यांत खणखणीत बजावली. गमावण्यासारखं काहीच नसल्यानं राज मोकळेढाकळे बोलताहेत आणि इथंच भाजप फसतोय. राज ना राज्याच्या सत्तेच्या राजकारणात आहेत, ना देशाच्या. त्यांना सत्तेच्या राजकारणाच्या हौद्यात ओढलं, तर कुस्तीचा निकाल भाजपच्या बाजूनं लागण्याची शक्यता अधिक होती. राज सत्तेच्या राजकारणाबाहेर राहून प्रश्न विचारत आहेत. त्यामुळं त्यांचा आवाज केवळ राजकारण्यांचा आवाज बनलेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडं गमावण्यासारखं बरंच काही होतं आणि आहेही. त्यामुळं, दोन्ही पक्ष गुमान राज यांच्या मागं मागं चालतील आणखी काही आठवडे. फुकटच्या टाळ्या पिटण्यापलिकडं त्यांच्यावर तशीही जबाबदारी काही नाहीय. 

लोकांना काय मिळतंय या साऱया भाषणांमधून, हे खरं कुतुहूल आहे. सत्तेला खणखणीत प्रश्न विचारणं लोकांना आवडतं. असेच प्रश्न मोदी 2014 ला विचारत होते. तेव्हाही लोक हात दुखेपर्यंत टाळ्या पिटायचेच. मोदी तेव्हा पुरावे म्हणून कॅग वगैरेंचे अहवाल मांडायचे. धरणातलं पाणी कसं भ्रष्टवाद्यांनी पळवलं वगैरे सांगायचे. पाच वर्षे संपत आली, तरी मोदी तेच सांगताहेत. मग तु्म्ही सांगितलेल्या गोष्टींचं काय झालं, तुम्ही दाखवलेल्या गोष्टी किती खऱया-किती खोट्या, हे सामान्य लोकांच्या मनातले प्रश्न होते. ते राज यांनी उघड्यावर दणदणीत विचारले. 

लोकांच्या मनातले प्रश्न विचारायचं धाडस विरोधकांमध्ये नव्हतं. त्यामुळं तो आवाज क्षीण बनला होता. गावच्या सीमेवर गायब होणारं डिजिटल इंडिया, मुद्राचा मुडदा, मेक इन इंडियाचा राफेलपलिकडं न गेलेला लाभ अशा अनेक प्रश्नांचं काहूर माजलं आहे. मुद्दे सोडून राष्ट्रवाद, पाकिस्तान, युद्ध, हिंदू-मुस्लिम हे ताणलं जात आहे. याबद्दल अस्वस्थता आहेच. बेरोजगारी, शेतीतली वाढती तुट भयाण वास्तव घेऊन समोर येते आहे. म्हणून सभांमध्ये गरजणारा राज यांचा आवाज सामान्य लोकांचा आवाज बनतो आहे. परिणामी, एकापाठोपाठ एक सभा प्रभावी बनताहेत. हा भाजपनं कदाचित प्लॅनिंगमध्ये न घेतलेला हा मुद्दा आहे. त्यामुळं भाजप गोंधळतो आहे. 

 raj thackeray

मोदींना जशास तसं उत्तर देण्याची ताकद शरद पवारांमध्ये होती. ती वापरण्याचं त्यांचं शारीरिक वय राहिलेलं नाहीय. धनंजय मुंडेंसारख्या नेत्यांना पवारांएेवढी समज आणि लोकाश्रय मिळायला अजून पंचविस वर्षे लागतील. अशोक चव्हाणांचं भाषण एेकण्याएेवजी टीव्ही म्युट ठेवलेला परवडतो. पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेस अंतर्गत राजकारणातून डोकं बाहेर काढायला सवड नाही. उद्धव ठाकरेंनी तलवार शहाभाईंकडं देऊन टाकलीय. मग सत्तेला प्रश्न विचारणारा धमक असलेला उरला कोण, प्रश्नाचं उत्तर राज यांनी आजच्यापुरतं देऊन टाकलं आहे. 

आता, सभेला येणारे लोक काय घेऊन जातात, याचा अंदाज घेऊ... 

गर्दी मतांमध्ये परिवर्तन घडवून आणतच नाही, असं नाही. 1995 च्या निवडणुकीत ट्रकभर पुराव्यांच्या गोष्टी सांगत फिरणारे गो. रा. खैरनार आठवतात? त्यांच्या सभांना हजारोंची गर्दी व्हायची. परिवर्तन झालं. युती सत्तेवर आली. महात्मा गांधींचं प्रतिरूप बनवून अण्णा हजारेंना दिल्लीत आंदोलनाला बसवलं 2011 मध्ये आणि तिथूनच काँग्रेसची उतरण सुरू झाली. खैरनार किंवा अण्णा दोघेही प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात नव्हते. राज आज त्याच जागेवर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष राजकारणात राज नाहीयत. त्यामुळं, त्यांना प्रत्यक्ष लाभ काहीच नाहीय. जो होईल, तो विधानसभा निवडणुकीत. त्याला अजून सहा महिने अवकाश आहे. मनातले प्रश्न राज यांनी विचारले, हा मुड घेऊन गर्दी परततेय. या प्रश्नांची कुणालाच मिळालेली नाहीयत. त्यामुळं, उत्तरं शोधण्याचा मार्ग मतदान असा निर्णय जनतेनं केला, तर भाजपचं काही खरं नाही, हे निश्चित. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These are the reasons of peoples come together for Raj Thackerays Public Rally Meeting