Loksabha2019 : मतदानाचा वेळ आता दीड तासांनी वाढवला 

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 4 एप्रिल 2019

- एक मतासाठी लागणार 22 सेकंदांचा वेळ 
- साडेनऊऐवजी होणार आता अकरा तास मतदान 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत प्रथमच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट या यंत्राचा वापर होत आहे. एका मतासाठी 22 सेकंदांचा वेळ लागणार आहे. दरम्यान, मतदानाचा टक्‍का वाढावा तसेच नव्या तंत्राच्या वापराला वेळ मिळावा, यासाठी तब्बल दीड तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. पूर्वी साडेसात ते पाच असा वेळ दिलेला असे. आता सकाळी सात ते सायंकाळी सहा असा वेळ राहणार आहे. 

व्हीव्हीपॅट मशीन म्हणजे काय, ते कसे चालते? 

मतदार ईव्हीएमवर उमेदवाराच्या नावासमोरचे बटन दाबतो. त्याचवेळी उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप सात सेकंद मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप सीलबंद पेटीत जमा होते. 

मतदान करताना काही तांत्रिक अडचण उद्भवली असेल, तर त्याचीही माहिती दिली जाते. जे ठरवलं तसंच मतदान केलं आहे ना? याची खातरजमा करण्याची संधी मतदाराला या माध्यमातून मिळते. 
व्हीव्हीपॅट मशीन काचेच्या पेटीत असते. 

सावलीसोबतच पाणी अन्‌ आरोग्य सुविधा 

ज्या मतदान केंद्रावर लांब रांगा लागू शकतात, अशा ठिकाणी सावलीची व्यवस्था करण्यात येईल. तसेच प्रत्येक मतदार केंद्रावर आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात येणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात येईल, असे नियोजन निवडणूक विभागाकडून सुरू आहे. 

"आतापर्यंत सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळेतच मतदान होत असे. मात्र, यावेळी सकाळी अर्धा तास अगोदर म्हणजे सातपासून सुरवात होईल. तर सायंकाळी पाचऐवजी सहापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील.'' 
- नीलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी 

Web Title: Timing of voting extend by 1 and half hour