Loksabha 2019 : हवामानाप्रमाणे उद्धव ठाकरे बदलतात : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

महाराष्ट्रात एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंवा त्यांनी केलेल्या विधानात एक सातत्य असायचे.

कोल्हापूर : महाराष्ट्रात एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंवा त्यांनी केलेल्या विधानात एक सातत्य असायचे. परंतु, आज ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, ते हवामान बदलेल तशी त्यांची धोरणेही बदलतात, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

पवार म्हणाले, "पंढरपूरच्या सभेत त्यांनी भाषण केले, की युती गेली खड्ड्यात. आता हे खड्ड्यातून वर कसे आले? गळ्यात गळे कसे घालायला लागले? अफझलखानाला मिठ्ठी कशी मारू लागले आणि तेच आता आमच्यावर टीका करीत आहेत. जे बोलतो त्यात बाळासाहेब ठाकरे असताना सातत्य होते, ते आता यत्किचिंतही राहिलेले नाही.'' 

आमचेच नव्हे, तर कॉंग्रेसचेच लोक फोडले आहेत. प्रत्येक निवडणुकीत पश्‍चिम महाराष्ट्र हेच केंद्र असते. गेल्या दोन-तीन निवडणुकीत ते दिसले आहे. सर्वांचे लक्ष इकडेच असते. त्यातही माढा, सांगली, बारामती, कोल्हापूर इथेच ते लक्ष घालतात, कारण त्यांचे आमच्यावर प्रेम आहे, असे पवार म्हणाले. 

राज ठाकरेंचा एककलमी कार्यक्रम 

राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम म्हणजे, मोदी- शहा ही जोडगोळी देशाला घातक आहे, हे सांगणे आणि ते हे पटवून देत आहेत. त्यांच्यावर काही बंधन नाही. त्यांनी उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यांना निवडणुकीचा खर्च सादर करावा लागत नाही. त्यामुळे सरकारही त्यांना काही करू शकत नाही.

जे चुकीचे चालले आहे, ते स्वतः ठाकरे सौदाहरण मांडतात. मोदी पूर्वी काय बोलले आणि आता काय बोलत आहेत, याचा व्हिडिओ ते दाखवत आहेत आणि ते प्रभावी होत आहे. त्या-त्या ठिकाणच्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल हे सांगतानाच, राज्यातही युतीला रोखण्यासाठी ज्यांना ज्यांना बरोबर घेतले जाईल, त्यात मनसेचीही चर्चा होऊ शकते, असे सुचक वक्‍तव्य पवार यांनी केले.

Web Title: Uddhav Thackeray Changing Like Weather says Sharad Pawar