Loksabha 2019 : संकल्पपत्रावरून विचारताच पळाले भाजपचे मंत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

एका पत्रकाराने विचारलेला प्रश्न न आवडल्याने त्यांनी थेट भर मुलाखतीतूनच काढता पाय घेतला. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध पक्षांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. या प्रचारसभांच्या माध्यमातून टीका-टिप्पणीही केली जात आहे. असे असताना मोदी सरकारमधील कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. मात्र, यामध्ये एका पत्रकाराने विचारलेला प्रश्न न आवडल्याने त्यांनी थेट भर मुलाखतीतूनच काढता पाय घेतला. 

बिहारमधील पटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून रविशंकर प्रसाद यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. रविशंकर प्रसाद यांनी 8 एप्रिल रोजी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी पत्रकार अजित अंजुम यांनी रविशंकर यांना भाजपच्या जाहीरनाम्यावरून एक प्रश्न विचारला. अंजुम यांनी विचारलेला प्रश्न रविशंकर यांना चांगलाच खटकला. या प्रश्नावरुन संतापलेल्या रविशंकर यांनी ''तुम्ही मला राष्ट्रनिर्माणाबाबत प्रश्न का विचारत नाही?'' असा उलटा प्रश्न अंजुम यांना केला. तसेच ''तुमच्या कार्यक्रमात मी का थांबावे? मी आता नाही थांबणार,'' असे रविशंकर म्हणाले. 

तसेच ते पुढे म्हणाले, ''जर तुम्ही वरिष्ठ संपादक आहात तर मी सुद्धा देशाचा एक वरिष्ठ नेता आहे'', असे म्हणत रविशंकर यांनी मायक्रोफोन काढून लाइव्ह कार्यक्रमातून काढता पाय घेतला. या प्रकारानंतर या वृत्तवाहिनीतील पत्रकारांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पण अखेर ते निघूनच गेले. 

Web Title: Union Minister Ravi Shankar Prasad Left A Live Tv Show Due to He Didnt Like The Questions