Loksabha 2019 : 'शीखविरोधी दंगलीतील पीडितांना अद्याप न्याय नाही'

पीटीआय
रविवार, 14 एप्रिल 2019

1984 च्या शीखविरोधी दंगलीतील पीडितांना, दलितविरोधी हिंसाचाराला बळी पडलेल्यांना आणि भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांना कॉंग्रेस न्याय देऊ शकली नाही; तर "न्याय' योजनेतून गरिबांना कसा न्याय देईल.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

थेनी (तमिळनाडू) : 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील पीडितांना, दलितविरोधी हिंसाचाराला बळी पडलेल्यांना आणि भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांना कॉंग्रेस न्याय देऊ शकली नाही; तर "न्याय' योजनेतून गरिबांना कसा न्याय देईल, असा सवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केला. तमिळनाडूचे भूमिपुत्र एमजीआर यांच्यावरही कॉंग्रेसने अन्याय केला, असेही मोदी म्हणाले. 

कालच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत त्यांनी न्याय योजनेचे लाभ सांगितले. तो संदर्भ पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसच्या धोरणावर टीका केली. अप्रामाणिकपणा आणि कॉंग्रेस, हे चांगले मित्र आहेत. ते कधीतरी चुकीने खरे बोलतात, अशीही टीका मोदींनी केली. ते म्हणाले, की "अब होगा न्याय' असे ते म्हणत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी अन्यायच केला, हे एका अर्थाने त्यांनी मान्य केले. "न्याय' योजनेतून गरिबांना मदत करण्याचा दावा करणाऱ्या कॉंग्रेसला मी विचारू इच्छितो, की 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील पीडितांना न्याय मिळू शकला का? असा प्रश्‍न मी कॉंग्रेसला विचारू इच्छितो.

तमिळनाडूचे सर्वेसर्वा एम. जी. रामचंद्रन यांच्यासमवेत न्यायपूर्ण व्यवहार केला का? एका कुटुंबाला ते आवडत नसल्याने कॉंग्रेसने त्यांना पदच्युत केले. भोपाळ वायुकांडातील पीडितांना न्याय मिळू शकला का? कॉंग्रेसच्या काळात घडलेल्या घटनांमुळे पीडित व्यक्तींना न्याय मिळू शकला नाही. गरीब आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कल्याणकारी योजनांचा लाखो जनेतला लाभ मिळाला आहे, असे मोदी म्हणाले. शबरीमलाप्रकरणी भाजप नागरिकांसमवेत आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले. 

Web Title: Victims of anti Sikh riots have no justice yet says Narendra Modi